रंगभूमी – रंगभूमीची समग्र जाणीव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सायली पावसकर

प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार दडलेला असतो. कला मनुष्याला भेदांच्या, सीमांच्या, अवडंबरांच्या बंधनांतून उन्मुक्त करते. व्यक्ती जेव्हा कलाकार म्हणून जगू इच्छिते तेव्हा समाज जीवन व्यापनाच्या प्रश्नांत तिला अडकवतो. मी एक कलाकार म्हणून जगण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हे प्रश्न माझ्याही समोर आले. नाटक ही ठराविक तासांची नोकरी नसून ती रंगभूमीची साधना आहे हे तत्त्व माझ्या आत रुजले.

नाटकाने केवळ पोटपाणी कसं चालेल हे पाहणाऱया वृत्तीने आणि प्रसिद्धीच्या हव्यासाने ‘तत्त्व, विचार आणि कलात्मक समृद्धीचा’ अभाव रंगभूमीवर निर्माण केला. रंगभूमीवर हा भ्रम त्यामुळेच प्रचलित झाला की वैचारिक, गंभीर म्हणजे प्रायोगिक नाटके व व्यावहारिक गणितात बसणारी ही व्यावसायिक नाटके. नाटक हे नाटक असते, त्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक असा भेद करणे ही निव्वळ वरवरची, रुढीवादी आणि प्रतिगामी समज आहे.

नाटककार, साहित्यकार कलाकारांना माणूस म्हणून पाहतात का? नाटक, साहित्य आणि सिनेमात महिला कलाकारांची भूमिका काय आहे? एकतर महिलांना पुरुषांच्या ‘लैंगिक’ संतुष्टीच्या भूमिकांपर्यंत मर्यादित केले आणि शरीरप्रदर्शन करणारी ‘शोभेची वस्तू’ केलेले आहे. चुगलखोर, फसवणूक करणारी, घर उद्ध्वस्त करणारी, एखादीचा नवरा हिसकावून घेण्याचा कट रचणारी, पाताळयंत्री म्हणूनच चित्रित केले जाते आणि पुरुष कलाकारांना पितृसत्तात्मक सरंजामशाहीला पुढे नेणाऱया अहंकारी भूमिकांत अडकवले जाते. ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय़ सिद्धांताची’ कलात्मक सृजनप्रक्रिया कलाकारांना मग ती महिला असो वा पुरुष यांना शरीरापलीकडे एक सृजनकार स्वरूपात पाहते. ‘समानता, बंधुता आणि न्यायाचे’ पुरस्कर्ते असणाऱया ‘माणूस’ या दृष्टीने पाहते. म्हणून नाटकांत मी एक महिला असले तरी माणूस म्हणून भूमिका साकारल्या आहेत. ‘राजगति’ नाटकात गांधी, आंबेडकर आणि भगतसिंग या पुरुष भूमिका आहेत किंवा सहसा पुरुष कलाकाराला त्या अदा करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. तिथे आम्ही त्यांना विचार म्हणून पाहिले व मी भगतसिंगचे चरित्र, कोमल खामकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तर अश्विनी नांदेडकर यांनी गांधींचे चरित्र प्रस्तुत केले. ‘छेडछाड क्यों?’ नाटकात छेडछाड करणाऱया मवाली मुलांची आणि बलात्कारी पुरुषाची भूमिका आम्ही साकारली. छेडछाड करणाऱया मानसिकता ज्या समाजात आपल्याला दिसतात, त्या विकारांना आम्ही सक्षमतेने रंगभूमीवर साकारले. मला आठवतं ‘छेडछाड क्यों?’चा प्रयोग झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांचे अनुभव ऐकले तर त्यांना आमचा प्रचंड राग आला होता. प्रेक्षक म्हणाले, आम्हाला छेड काढणाऱया प्रत्येक पुरुषाचे प्रतीक तुमच्यात दिसत होते आणि त्याने संताप होत होता. ‘छावणी’ नाटकात आम्ही पुरुष पात्रांना महिला पात्र केले आणि जे महिलेच्या पात्राला पुरुष पात्र केले. यातून आम्ही नाटककारांत ही दृष्टी निर्माण केली, की त्यांनी अशी नाटके, अशा भूमिका लिहायला हव्या ज्या केवळ प्रतीकात्मक न राहता समग्र असतील आणि महिलांच्या चरित्राचे समग्र अस्तित्व दर्शवतील.

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाटय़ सिद्धांताने प्रेक्षकांतही नाटक पाहण्याची रंगदृष्टी निर्माण केली. ‘गर्भ’ ते ‘लोक-शास्त्र्ा सावित्री’ या नाटकापर्यंतच्या प्रवासात आम्ही असंख्य प्रेक्षकांना प्रेक्षक-संवादाच्या माध्यमातून वैचारिक रंगदृष्टीशी जोडले. मराठी रंगभूमीवर वैचारिक नाटके चालतात आणि प्रेक्षक अशा वैचारिक नाटकांना उदंड प्रतिसाद देतात, हा विश्वास आमच्या पुढाकाराने मराठी रंगभूमीवरील रंगकर्मींमध्ये निर्माण झाला. आज आमच्या पावलावर पाऊल टाकत मराठी रंगभूमीने वैचारिक नाटकांची कास धरली आहे. रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी वैचारिक प्रगतिशीलतेचा झेंडा आम्ही रोवला आहे. याचा रंगकर्मी म्हणून मला अभिमान आहे.

– [email protected]