
>> आसावरी जोशी
रतन टाटा या पाच अक्षरी शब्दांचा जादुई स्पर्श ज्यांना होतो.. त्यांचे आयुष्य नव्या प्रेरणेने बहरून येते.. सोनेरी होते.. पुण्याचे दोन तरुण उद्योजक.. अदिती भोसले, चेतन वाळूंज.. काही वर्षांपूर्वी रेपोज एनर्जी नावाचा स्टार्टअप सुरु केला. पण त्यांच्या असे लक्षात आले की हा उद्योग पुढे नेण्यासाठी मार्गदर्शकाची गरज आहे. माणसांनी स्वप्न नेहमी मोठी पहावीत.. रतन टाटाना या संदर्भात भेटण्याचे दोघांनी नक्की करून त्यादिशेने प्रयत्न सुरूही केले.. पण स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता. अदितीने ३डी सादरीकरण तयार केले आणि हस्तलिखित पत्र टाटाना पाठविले. टाटांच्या घराबाहेर १२ तास वाट पहिली. दमून रात्री दहाच्या सुमारास ते हॉटेलवर परतले.. आणि त्यांना एक फोन आला. पलीकडून अतिशय नम्र सुरात आवाज आला, हलो.. मी आदितीशी बोलू शकतो..? आदितीला आवाज आला.. “मी रतन टाटा बोलतो आहे, मला तुझे पत्र मिळाले , आपण भेटू शकतो का?”
ठीक ११ वाजता निळा शर्ट घातलेला एक उंच, गोरा माणूस खोलीत आला, ते रतन टाटा होते. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत ही दोघेजण टाटाबरोबर होते. या मंतरलेल्या तीन तासांनंतर मोबाईल उर्जा वितरण स्टार्टअप रेपोज एनर्जीने सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग मशीन रतन टाटांच्या गुंतवणुकीतून सुरु झाला आहे.
आपल्याकडे कल्पक उद्योजक ही एक खूप छान संकल्पना आहे, जी रतन टाटांना तंतोतंत लागू पडते. सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणे हे टाटांचे वैशिष्ठ्य. येथे टाटा सांगतात. जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकट्याने पुढे जा. आणि जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर सर्वाना सोबत घेऊन चला. आभाळाएवढ्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप प्रेरणादायी असतात. जाणून घेऊया रतन टाटांविषयी काही वेगळ्या गोष्टी.
टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या पालकांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा छोट्या रतनच्या आजीने त्याला दत्तक घेतले आणि त्याला मोठे केले.
टाटांचे आपल्या कर्मचाऱ्यांवर अतिशय प्रेम आहे. टाटा समूहात नोकरी करणे हे सरकारी नोकरीपेक्षा कमी नसते. रतन टाटा पेटीएम , ओला अशा नवीन स्टार्टअपमध्ये सहज गुंतवणूक करतात.
रतन टाटा यांनी टाटा स्टीलचे कर्मचारी म्हणून १९६१ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९९१ मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. टाटांनी आपल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत टाटा समूहाला सर्वोच्च पातळीवर आणले. त्यांच्या कारकिर्दीत कंपनीचा नफा पाच पटीने वाढला. सुरुवातीला त्यांनी जे निर्णय घेतले ते सिद्ध करून दाखविले. येथे टाटा सांगतात, “मी कधी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. तर घेतलेलें निर्णय योग्य ठरवून दाखवतो.
२००८ मधील २६/११ च्या हल्ल्यात रतन टाटांनी केलेली मदत साऱ्या जगासमोर आदर्श ठरली. त्यांच्या पंचतारांकित ताजच्या शेजारच्या दुकानातील जखमी माणसानाही टाटांनी मदत केली होती. जोपर्यंत ताज बंड होते तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात होते.
रतन टाटांचे गाड्यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. १९९९ मध्ये इंडिका रस्त्यावर आणून एक वर्ष झाले होते. त्यादरम्यान टाटा डेट्राॅइट येथील फोर्डच्या मुख्यालयात गेले होते. त्यादिवशी फोर्डचे सर्वेसर्वा बिल फोर्ड यांनी टाटांचा खूप अपमान केला. त्याच रात्री टाटा हिंदुस्थानात परतले. त्यानंतर संपूर्ण लक्ष टाटा मोटर्सवर केंद्रित करून टाटाच्या अनेक गाड्या रस्त्यावर आणल्या. पुढे २००९ मध्ये फोर्ड कंपनी पूर्णपणे कर्जात बुडाली रतन टाटांनी त्यांना प्रस्ताव पाठवला. आम्ही फोर्ड खरेदी करतो. फोर्डपुढे दुसरा पर्याय नव्हता. टाटांनी जॅग्वार ब्रान्डला ९६०० कोटीमध्ये विकत घेतले.
अजूनही रतन टाटा हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती का नाहीत हा प्रश्न बऱ्याचजणांना पडला असेल. कारण टाटा समूह हा टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. या समूहाची ६६% मिळकत या ट्रस्टमध्ये जाते. व त्यातून अनेक समाजोपयोगी कामे केली जातात.
रतन टाटांच्या मते महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे. ज्याने आपला देश आणखी मजबूत होईल. जसे, पाणी जपून वापरणे, विजेची बचत करणे, आवश्यक तेवढेच अन्न घेऊन अन्नाचा अपव्यय टाळणे.
जीवनात पुढे जाण्यासाठी चढ उतार खूप आवश्यक आहेत.
आपल्या देशाचा टाटांना खूप अभिमान आहे. ते सांगतात, मी हिंदुस्थानचे भविष्य आणि त्याची क्षमता याबाबत खूप आश्वस्त आहे. हा खूप महान देश आहे. आणि माझ्या देशात खूप क्षमता आहे.
| ReplyForward |





























































