पुरुषांनो, चेहरा आकर्षक करण्यासाठी कोणती सौंदर्य उत्पादने वापराल, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुतेक पुरुषांना त्वचेची निगा राखण्यासाठी कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असते, याविषयी कल्पना नसते. त्वचेचा पोत सुधारावा, चारचौघात उठून दिसावे असे वाटत असेल तर पुरुषांनी त्यांच्या स्किन केअर रुटिनमध्ये विशिष्ट प्रकारचे मॉइश्चरायझर्स,  स्क्रब,  लिप बाम आणि केसांसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांचा समावेश करणे आवश्यक असते. या उत्पादनांचा वापर करून पुरुष आपल्या सौंदर्याची काळजी घेऊ शकतात.

सर्वसामान्यत: स्त्रिया आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतात. काही जणी तर सौंदर्य उत्पादने नेहमी आपल्या सोबत ठेवतात, पण बिझी शेड्युलमुळे पुरुषांना त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यास जास्त वेळ मिळत नाही. याकरिता आवश्यक तेवढ्या उत्पादनांचा वापर करून पुरुष त्वचा आणि केस यांची निगा राखू शकतात. पाहूया, पुरुषांनी कोणती सौंदर्य उत्पादने वापरणे आवश्यक आहे.

मॉइश्चरायझर आणि स्क्रब आवश्यक

त्वचेनुसार, मॉइश्चरायझर आणि स्क्रबची निवड करू शकता. त्वचा तेलकट असेल तर पाणी किंवा तेल हे सर्वोत्तम मॉइश्चरायझर ठरू शकते. कोरड्या त्वचेसाठी तेल सर्वोत्तम मॉइश्चरायझर आहे. याचा वापर करावा. याशिवाय स्क्रबचा वापर केल्यास त्वचेतील मृत पेशी आणि मळ काढून त्वचेवर चमक आणण्यास मदत होते.

लोशन आणि लिप बाम

जळजळ, सूज येणे आणि लालसरपणा टाळण्यासाठी पुरुषांनी विशेषतः शेव्हिंगनंतर लोशन वापरावे. यासाठी अल्कोहोल फ्री आफ्टरशेव्ह लोशन वापरून पाहू शकता. ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि ओठ मऊ ठेवण्यासाठी लिप बाम किंवा व्हॅसलीनचा वापर करणे चांगले.

त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पुरुषांच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी, त्वचेच्या काळजीमध्ये सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावायला विसरू नका. सनस्क्रीन निवडताना, किमान 20 एसपीएफ असलेले सनस्क्रीन खरेदी करा. चांगल्या संरक्षणासाठी SPF 50 असलेले सनस्क्रीन वापरून पाहू शकता.

केसांची विशेष काळजी कशी घ्याल ?

केसांची विशेष काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा हर्बल शॅम्पूने केस धुवा. यामुळे टाळूवर मळ जमा होणार नाही. त्याचबरोबर केसांना सुंदर, मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी शॅम्पूनंतर कंडिशनर लावायला विसरू नका. याशिवाय केस मुळापासून मजबूत आणि निरोगी होण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल किंवा एरंडेल तेलाने केसांना मसाज करा.

कन्सीलर आणि हायलाइटर लावा

त्वचेची काळजी घेण्यासाठी विशिष्ट प्रसंगी कन्सीलर आणि हायलाइटरदेखील वापरू शकता. त्वचेच्या टोननुसार कन्सीलरचा वापर त्वचेवरील डाग लपवण्याचे काम करतो. त्याचबरोबर गाल, भुवया,  नाक आणि ओठांच्या आसपास हायलायटर वापरून  चेहऱ्याला आकर्षक लुक देऊ शकता.