शिवसेनेच्या सदस्यांची विधिमंडळ कामकाज समितीवर नियुक्ती करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीवर अद्यापही अधिकृत शिवसेना सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा विषय लावून धरण्यात आला. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना गटनेते अजय चौधरी, पक्षप्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती या सल्लागार समितीवर करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी मागणी केली.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य म्हणून सर्व पक्षांतील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अधिकृत शिवसेना सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. आज विधान भवनात महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून पक्षपातीपणा केला जात असल्याची भूमिका मांडण्यात आली. यानंतर अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील सदस्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना हा अधिकृत पक्ष असून आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, न्यायालयातही यावर निर्णय झालेला नाही. विधिमंडळाच्या नियम 164 नुसार मान्यताप्राप्त पक्ष, गट यांच्या प्रमुखांना कामकाज सल्लागार समितीवर सदस्य नेमण्याचा अधिकार असल्याचे नमूद आहे. त्यानुसार शिवसेनेचे सदस्य समितीवर नेमण्यात यावेत अशी मागणी गटनेते अजय चौधरी यांनी केली. त्याचप्रमाणे शिवसेनेने यासंदर्भात पाठविलेल्या पत्रांनाही अध्यक्षांकडून उत्तर देण्यात आली नसल्याची बाबही निदर्शनास आणण्यात आली.

सल्लागार समितीवर अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले. विरोधी पक्षाच्या या आग्रही भूमिकेनंतर अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार अनिल परब, सचिन अहिर, मनीषा कायंदे आदी उपस्थित होते.