दोन मंत्र जीवनात आणा, रोगांपासून स्वत:ला दूर ठेवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे

सकाळपासून हा चौथा कप आहे चहाचा… अगदी काळ-वेळ, काहीही बघत नाही तुम्ही… मालतीताई चहाचा कप टेबलवर आदळत आपल्या यजमानांना ऐकवत होत्या. त्यांच्या या बोलण्यावर किंचितही प्रतिसाद न देता काकांनी तो चहा संपवला.

सहज मनात आले की हवा, पाणी व अन्न या आपल्या शरीरासाठी जीवनावश्यक गरजा आहेत. ज्याप्रमाणे शरीराने आवश्यक तेवढी हवा शरीरात घेण्याचे हक्क स्वतःकडे ठेवले, तसे अन्न व पाण्याचेही झाले असते तर? विचार करता असे लक्षात येते की व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने, प्रत्येकाचे शरीर हे वेगळे आहे; म्हणूनच शरीर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सिग्नल देत असते. कुणाला वारंवार भूक लागते, किंवा एखाद्याला सतत तहान लागते. एखादयाला दही मानवते, तर एखाद्याला ते बाधते. म्हणूनच समान उंचीच्या व समान वजनाच्या वेगळ्या दोन व्यक्तींना सारख्या कॅलरीज चा आहार दिला असता त्यांचे वजन कमी होण्याचे अथवा वाढण्याचे प्रमाण भिन्न असते.

माझ्या मते प्रत्येकाने आपल्या शरीराला प्रथम मान देऊन शरीराचे म्हणणे ऐकले पाहीजे. शरीराला सहज पचेल, आवडेल असे गुण व मात्रेमध्ये सम्यक अन्न सेवन केले पाहिजे. आवड अथवा आग्रहाला बळी पडून होणाऱ्या त्रासाला सर्वस्वी आपणच जबाबदार असतो आणि ते निश्चितच टाळायला हवे.

आपल्यापैकी बऱ्याचजणाना चहा किंवा इतर पदार्थांचे व्यसनच लागलेले असते.व्यसन लागण्यासाठी कारणे वेगवेगळी असली, तरी हळूहळू शरीर त्यावर अवलंबून रहायला लागते. म्हणूनच “अती सर्वत्र व्यर्जयेत्।” व “सम्यकेव जयते” हे दोन  मंत्र आपल्या जीवनात आणले पाहिजेत. ही वाक्य आपली ब्रीदवाक्य बनवली पाहिजेत. तर बऱ्याच शारीरिक व मानसिक लढाया युद्धाशिवायच जिंकल्या जातील.

डॉ. नम्रता महाजन-भारंबे;
Obesity consultant & nutritionist