
>> मुलाखत – नमिता वारणकर
दहीहंडी अर्थात गोपाळकाला…पुरुषांप्रमाणे महिलाही दहीहंडी पथकात सहभागी होऊन या सणाचा आनंद घेतात. यंदा दोन वर्षांनी कोरोना लॉकाऊननंतर निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. यावर्षीचं दहीहंडीचं वेगळेपण, या खेळात झालेले बदल आणि दोन वर्षांनंतर महिला पथकांचा मिळालेला प्रतिसाद याविषयी पार्ले स्पोर्ट क्लब आणि महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीच्या अध्यक्ष गीता विनोद झगडे यांच्याशी साधलेला संवाद !
महिला दहीहंडी पथकाचं यावर्षीचं वेगळेपण काय ?
दोन वर्षांनी कोरोनानंतर प्रत्येक मुलीला घरून गर्दीत पाठवण्यासाठी भीती वाटतेय. असं असलं तरीही मुली या कुटुंबियांना वाटणाऱ्या भितीला बाजूला सारून दहीहंडी पथकात सहभागी झाल्या आहेत. दहीहंडीद्वारे आम्ही दरवर्षी ‘मुलींना शिकवा आणि घडवा’, अशी जनजागृती करतो. हे जुनं मत असलं तरीही आमच्या पथकाचं असं म्हणणं आहे की, आम्हाला आरक्षण नाही तर संरक्षणाची गरज आहे. बहुतांश वेळा असं लक्षात आलंय की, दहीहंडीच्या वेळी मुलांना भरमसाठ बक्षीस असतात, त्या तुलनेत महिला दहीहंडी पथकासाठी कमी किमतीची बक्षीस ठेवली जातात, पण मुलं जर 7 थर लावतात, तर मुलींचेही 5 आणि 6 थर असतात. त्यामुळे बक्षिसामध्ये भेदभाव करू नये असं वाटतं. यावर्षीचं वेगळेपण म्हणजे आम्ही 7 थर लावणार आहोत. मुलांपेक्षा मुलीही कुठे कमी नाहीत हे दाखवून देणार आहोत.
कोरोना लॉकडाऊननंतर दोन वर्षांनी दहीहंडी साजरी करताना काय भावना आहेत ?
यावर्षी मंडळाची आर्थिक बाजू अगदीच नाजूक आहे. दहीहंडी मंडळ हीच गणपती मंडळ असतात आणि गणपती मंडळ हीच नवरात्रोत्सव मंडळ असतात. दहीहंडीद्वारे मंडळातील मुलं-मुली देशाची संस्कृती जपत आहेत. एका पथकाचा लाख ते दीड लाख रुपये खर्च असतो. यामध्ये मंडळांच्या टी-शर्टचा खर्चही होतो, पण याव्यतिरिक्तही बस आणि खाण्याचा खर्च हेही पाहावे लागते. आयोजक गर्दी होईपर्यंत सगळ्यांना ताटकळत ठेवतात. त्यामुळे शून्यातून पुन्हा दोन वर्षांनी संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही दहीहंडी पथकं करत आहोत. काही जण फक्त आमच्याकडे पैसे कमवण्याच्या दृष्टीने, आम्हाला भरमसाठी बक्षीस मिळतात, असे आमच्याविषयी असलेले गैरसमज आहेत. आज आम्हा मंडळांकडे पैसे नसूनही सगळी मंडळं आपले सणं, महाराष्ट्रातील खेळाचा दर्जा जपण्यासाठी भक्कमपणे उभे आहेत.
दहीहंडीचा सराव करताना संसर्गजन्य आजार होऊ नयेत यासाठी सराव करताना आणि दहीहंडीच्या दिवशी विशेष काय काळजी घेणार आहात ?
प्रत्येक दहीहंडी फोडल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करणार आहोत. याकरिता गोविंदा पथकांना सॅनिटायझरच्या बाटल्या देण्यात येणार आहेत. मास्क, रुमाल, प्रथमोपचार पेटी, प्रत्येकाला पिण्याचे पाणी इत्यादी सोयीसुविधा सरावापासून दहीहंडीत सहभागी होणाऱ्या मुलींना दिल्या जाणार आहेत. गोविंदा पथकात 10 वर्षांच्या मुलींपासून 50 वर्षांच्या महिलांचा सहभाग असतो. कोरोना काळात बऱ्याच जणींच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. गोविंदा पथकात महाविद्यालयीन मुलींचा सहभागही जास्त आहे. बऱ्याचशा मुली नोकरी करून शिक्षण घेतात. दररोज 9 ते 12 या वेळेत सराव करतात. दहीहंडीला शाळा आणि महाविद्यालयात खेळ म्हणून मान्यता दिली आहे, पण प्रत्यक्ष याबाबत अंमलबजावणी व्हायला हवी. याचा फायदा महिला गोविंदा पथकांना नोकरीकरिता व्हायला हवा. दहीहंडीकडे फक्त एक दिवसाचा संस्कृती जपणारा खेळ म्हणून बघू नये.
परदेशात दहीहंडीकडे कोणत्या दृष्टीने पाहिले जाते ?
अमेरिका, लंडन, स्पेन, युरोप या ठिकाणीही दहीहंडीसाठी जाऊन आले आहे. येथे या सणाचा एक जल्लोष असतो. तीन पिढ्या एकाच वेळी दहीहंडी साजरी करण्यासाठी सहभागी होतात. नातवंड, आईवडील, आजीआजोबा हे सर्वच जण दहीहंडीचा आनंद घेतात, मात्र आपल्याकडे असे दिसत नाही. दहीहंडी हा एक साहसी खेळ आहे. याकडे साहसी खेळ म्हणूनच बघा. हा आपल्या मातीतला खेळ आहे. आपण यामध्ये अग्रेसर व्हायला हवे. आपला देश दहीहंडीकडे फक्त एक दिवसाचा सण म्हणून बघतो. त्याऐवजी याकडे खेळ म्हणून बघावे. दहीहंडीकडे बघण्याची लोकांची मानसिकता बदलायला हवी. मंडळांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
यावर्षी महिला दहीहंडीला कसा प्रतिसाद आहे?
दोन वर्षे कोरोनामुळे दहीहंडी खेळली गेली नाही. त्यामुळे काही बदल झाले आहेत. काही मुलींचे वजन वाढले आहे, तर काहींची लग्ने झाली आहेत. त्यामुळे जुन्या मुलींची संख्या कमी होत असली तरीही नवीन मुलीही दहीहंडी खेळाच्या आकर्षणामुळे पथकात जोडल्या गेल्या आहेत. नवीन मुलींना दहीहंडीचे प्रशिक्षणही द्यावे लागते. सराव करून घ्यावा लागतो.
महिला दहीहंडी आणि पुरुषांची दहीहंडी यामध्ये काय फरक आहे ?
शारीरिक क्षमता पुरुषांपेक्षा महिलांची थोडी कमी असते. वजन पेलवण्याची क्षमताही काही महिलांमध्ये कमी असते. दहीहंडीचे थर लावताना आणि सराव करताना या सगळ्या मुद्द्यांचाही विचार करावा लागतो. दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या काही महिलांची बाळंतपण झालेली असतात, काहींना मासिक पाळी आलेली असते. घरी लहान मुलांना ठेवून आलेल्या असतात. नोकरीच्या अडचणी यामुळे सराव करत असल्या त्यांना घरच्या जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात.
दहीहंडीचा सराव कसा करतात?
मुली मैदानावर धावणे, स्कॉट मारणे, वजन पेलवण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम करतात. प्रत्येक मुलीकडून व्यायाम प्रकार करून घेतले जातात. गणपती आणि मारुतीचा जयघोष झाल्यानंतर सरावाला प्रत्यक्ष सुरुवात होते.



























































