ही काय नौटंकी आहे?, जुना व्हिडीओ शेअर करत सिसोदीयांनी साधला मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून बिगरभाजप सरकार आणि विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले सुरूच असून, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआयने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यावरून सिसोदीया संतापले असून त्यांनी मोदींचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी या व्हिडीओत सीबीआयचा कसा गैरवापर केला जातो ते सांगत आहेत.

लुकआऊट नोटीसवरून सिसोदीया भडकले असून त्यांनी ”मोदी सरकारने ही काय नौटंकी लावली आहे” असा सवाल केला आहे. ”मी दिल्लीत सर्वत्र सर्वांसमोर फिरत आहे. सांगा मला कुठे यायचे आहे? असे सिसोदिया यांनी विचारले आहे. यासोबतच त्यांनी ट्विटवर एक मोदींचा जुना व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तो व्हिडीओ मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा आहे.

या व्हिडीओत मोदी काँग्रेस सरकारवर टीका करताना काँग्रेस सीबीआयचा गैरवापर करत असल्याचे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या व्हिडीओत सीबीआयचे अधिकारी राजकीय कामं करत आहेत असे देखील म्हटले आहे. सिसोदीया यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत एक खोचक शायरी देखील पोस्ट केली आहे. ”माना कि धीरे धीरे तो, मौसम भी बदलते रहते हैं, आपकी रफ़्तार से तो, हवाएं भी हैरान हैं साहब.”