कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटीची फिल्डींग; मुंबई- गोवा महामार्गावर जागोजागी दुरूस्ती पथके तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने गणेश उत्सवासाठी कोकणात दोन हजाराहून अधिक बसेसचे नियोजन केले आहे. त्यात मुंबई, ठाणे व पालघर विभागातून 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत 1268 बसचे ग्रुप बुकींग, 872 बसेस आरक्षित अशा एकूण 2140 बसेसचे बुकींग फुल्ल झाले आहे. तसेच मुंबई -गोवा महामार्गावर दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

गणपतीसाठी जादा वाहतूकीसाठी महामंडळाने इतर आगारातूनही जादा बसेस मागविल्या आहेत. त्यात अनुक्रमे मुंबई प्रदेश 610, पुणे 625, संभाजीनगर 550, नाशिक 475, अमरावती 50 अशा 2310 बसेसची सोय करण्यात आली आहे. पावसाळ्यात बसेस रस्त्यात बंद पडल्यास त्यासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची खास दुरूस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कुर्ला ते पनवेल, ठाण्याच्या रामवाडी ते कोलाड, कोलाड ते पोलादपुर, पोलादपुर ते चिपळूण, चिपळूण ते राजापूर, आणि राजापूर ते सावंतवाडी अशी दुरूस्ती पथकांची कार्यहद्द ठरविण्यात आली आहे. याशिवाय महामार्ग नजीकच्या आगारांमध्ये पेण, नागाठाणे, बसस्थानक, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली कार्यशाळेतील कर्मचार्‍यांना रात्रपाळीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.