
पारनेर तालुक्यातील निघोज येथील संदीप वराळ हत्याकांडातील आरोपी प्रवीण रसाळ आणि ऋषिकेश उैर्फ भय्या भोसले या दोघांचा मोक्का कारवाईतील जामीन नगर न्यायालयाने फेटाळला. नाशिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर रसाळ आणि भोसले यांनी नगर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी आरोपींच्या जामिनावर सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांनी जामीन फेटाळला आहे.
निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ यांची 21 जानेवारी 2017 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर हत्येचा मुख्य सूत्रधार आरोपी प्रवीण रसाळ, माउली रसाळ, विकास रसाळ, पिंटय़ा रसाळ, ऋषिकेश उर्फ भय्या भोसले, नागेश लोखंडे, राहुल साबळे, अक्षय लुढे, प्रशांत बर्डे, प्रशांत वराळ, राजू भंडारी आणि मुक्तार इनामदार यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.
मोक्कातील आरोपी माउली रसाळ, पिंटय़ा रसाळ, राजू भंडारी आणि मुक्तार यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या चौघांच्या जामिनानंतर वराळ हत्याकांडाचा मुख्य आरोपी प्रवीण रसाळ आणि ऋषिकेश उर्फ भय्या भोसले या दोघांनी नगर जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर युक्तिवाद होऊन प्रवीण रसाळ हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याने आणि आरोपी भय्या भोसले याचा हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याने न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत.


























































