सुभाषिणी – प्रतिज्ञायौगन्धरायण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋतुजा फडके

‘प्रतिज्ञायौगन्धरायण’ हे नाटक भासाच्या 13 नाटकांमधील यशस्वी नाटक मानलं जातं. महाकवि भासाने या नाटकाची रचना तेव्हाच केली जेव्हा त्याच्या लेखनाला सृजनत्व प्राप्त झालेलं होतं.

 

सूत्रधारकृतारम्भैर्नाटपैर्बहुभूमिपैः

सपतापैर्यशो लेभे भासो देवकुलैरिव?

हर्षाचा सभा पंडित म्हणून गौरविल्या जाणाऱ्या बाणभट्टाने ज्या नाटककाराची स्तुती व उत्कृष्टता वर्णन करताना ‘‘याची नाटके सूत्रधारापासून सुरू होणारी, सर्वाधिक भूमिका वठवणारी तसेच ज्यात देव-देवतांच्या पताका शोभायमान आहेत’’ असे म्हटले  तो संस्कृत साहित्यातला उत्कृष्ट नाटककार म्हणजे भास. आपण याआधीही भासाच्या नाटकांचा ऊहापोह लेखांमधून पाहिला आहे. त्याच्याच वेगळ्या अंगाच्या, वेगळ्या ढंगाच्या ‘प्रतिज्ञायौगन्धरायण’ या नाटकावर पुन्हा एकदा चर्चा आजच्या लेखात पाहणार आहोत.

‘प्रतिज्ञायौगन्धरायण’ हे नाटक भासाच्या 13 नाटकांमध्ये यशस्वी नाटक मानलं जातं. महाकवी भासाने या नाटकाची रचना तेव्हाच केली, जेव्हा त्याच्या लेखनाला सृजनत्व प्राप्त झालेलं होतं. हे नाटक चार अंकांमध्ये विभागलेलं आहे. नाटकाचं नामकरण नाटकातल्या एका पात्राने घेतलेल्या  प्रतिज्ञेवरून करण्यात आलं आहे.  नाटकात कथेचा विन्यास, पात्रांचं चरित्रचित्रण, संवाद शैली, सगळ्यांचाच प्रयोग यशस्वीरीत्या झालेला दिसून येतो. या नाटकातली संवाद शैली भासाने इतकी चोख सांभाळली आहे की, नाटकात पुढे काय होईल याविषयीची वाचकांची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोहोचते. जसं उदयन बंदी झाल्यानंतरचा वृत्तांत तसेच वासवदत्ताच्या  हरणाचा वृत्तांत. पात्रांच्या संवादामध्ये आपल्या प्रभावशाली शैलीने कोण्या नवागंतुकाच्या मार्फत अप्रत्याशित उत्तराची प्राप्ती करून भासाने आपल्या लेखनकलेची प्रचीती वाचकांना आणून दिली आहे.

चरित्र चित्रणामध्येसुद्धा नाटक अव्वल ठरलेलं आहे. उद्यान हा उच्चकोटीचा कलाप्रेमी तसंच सौंदयप्रधान राजा आहे. ज्याची ख्याती देशादेशांत पसरलेली आहे, तर यौगंधरायण अतिशय बुद्धिमान आणि नितिज्ञ आहे. हा मोठा स्वामिभक्त आहे. आपल्या स्वामिभक्तीने तो प्रतिज्ञा घेतो आणि त्यात सफलही होतो. नाटकांच्या पात्रांमध्ये स्वामिभक्ती पुरेपूर भरलेली दिसते.

नाटकात मानसिक मनःस्थितीचं वर्णन अधिकतम जाणवतं आणि म्हणूनच नाटककार वीर, करुण या रसांच्या अंतर्भावाने नाटक हृद्यद्रावक करण्यात यशस्वी झाला आहे. कन्यादान केल्यानंतर आईच्या मनाची स्थिती, उद्वेग, हतबलता आणि त्यातून उद्भवणारा करुण रस नाटकाच्या दुसऱ्या अंकात नाटककाराने उत्तमरीत्या वर्णिलेला आहे.

अदत्तेत्यागता चिन्ता दत्तेति व्यथितं मनः ।

धर्मस्नेहान्तरे न्यस्ता दुःखिताः खलु मातरः ।।27।।

म्हणजेच कन्येचं दान केलं नाही तर लज्जेला सामोरं जावं लागतं आणि दान केलं तर दुःखं पचवावं लागतं.  अशा प्रकारे धर्म आणि स्नेह यामध्ये अडकून कोणत्याही मातेला याच मनोवस्थेतून जावं लागतं.    कारागृहात बंदिवान झालेल्या उदयनाच्या तोंडी जेव्हा वासवदत्तेबद्दल प्रेमोद्गार येतात तेव्हा  यौगंधरायण कारागृहाचं वर्णन करताना त्यात शृंगार रसाचीसुद्धा झलक तिसऱ्या अंकात भासाने दाखवली आहे.

शक्ता दर्पयितुं स्वहस्तरचिताभूमिः कटप्रच्छदा

पर्याप्तो निगलस्वनश्चरणयोः कन्दर्पमालम्बितुम् ।

क श्रुत्वा न भवेद्धि मन्मथपटुः प्रत्यक्षतो बन्धने

रक्षार्थपरिगण्यमानपुरुषै राजेति शब्दायनम् ।। 36।।

म्हणजेच ज्या पृथ्वीवर आपल्या हाताने बनवलेल्या चटईवर झोपणेसुद्धा मद उत्पन्न करण्यास समर्थ आहे. जिच्या पायाचा साधा आवाजसुद्धा काम उद्दिप्त करतो, पण कारागृहात आपल्या रक्षणासाठी नियुक्त केलेल्या पुरुषांकडून ‘राजा’ हा शब्द ऐकून कोण कामातुर होईल?

निशितविमलखड्गः संहृतोन्मत्तवेषः 

कनकरचितचर्मव्यग्रवामाग्रहस्तः ।

विरचितवपुचीरः पाण्डराबद्धपट्टः 

सतडिदिव पयोदः किञ्चिदुद्गीर्णचन्द्रः । 4।3

म्हणजेच हे तेज चमकती तलवार हातात घेतल्याने आपल्या रूपाला परावर्तित करत डाव्या हातात तलवार घेतल्यामुळे, विविध प्रकारची वस्त्र धारण करून पांढरी पगडी धारण केल्यामुळे विजेने वेढलेल्या मेघाप्रमाणे सैनिक चंद्रासारखा भासत आहे. वीर, करुण, शृंगार या रसांचा समतोल राखत भासाने अशा प्रकारे हेही नाटक संस्कृत नाटय़सृष्टीत नावारूपाला आणलं.

[email protected]