
टिम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली खराब प्रदर्शनामुळे चर्चेत होता. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला सूर गवसत असल्याचे दिसत आहे. त्याने आशिया चषकाच्या सामन्यांमध्ये दोनवेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याची धडाकेबाज फटकेबाजी पाहण्यासाठी क्रिकेटरसिक वाट बघत आहे.
रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने दमदार कामगिरी केली. या सामन्यात टिम इंडियाचा पराभव झाला असला तरी विराटची खेळी मोलाची ठरली आहे. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. आपण कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर माजी कर्णधार एम. एस. धोनी याने फक्त मेसेज केला होता, असं विराट म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिकेवरुद्धच्या मालिकेमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर विराटने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडलं होतं. दमदार खेळी करण्यात अपयशी ठरत असल्याने त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरुनही काढण्यात आलं होतं.
आता त्याने एका महिन्याच्या विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धेमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या रविवारच्या सामन्यातही विराटने 60 धावांची खेळी केली. या सामन्यामध्ये पाकिस्तानने टिम इंडियाचा पाच गडी राखून पराभव केला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने धोनीचा आवर्जून उल्लेख केला. आपण कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीचा एकट्याचाच मेसेज मला आला होता. माझा फोन नंबर अनेक लोकांकडे आहे पण फक्त धोनीनेच मला मेसेज केला. जेव्हा खेळाडूंना एकमेकांबद्दल आदर वाटतो तेव्हा ते नातं अधिक घट्ट होतं. जेव्हा मला गरज असते तेव्हा मी धोनीशी संपर्क साधतो, असेही विराट म्हणाला. आमच्यात एकप्रकारचे नातेसंबध निर्माण झाले आहे. हे निस्वार्थ नाते आहे. धोनीला माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. तसेच मलाही त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नसल्याचे विराटने सांगितले.
आपल्या खेळीवर अनेकांनी टिका केली. आपल्याला अनेक सल्ले देण्यात आले. सल्ले देणाऱ्यांनाही विराटने चांदलेच सुनावले. आपल्याला खरेच मदत करायची असेल तर जगासमोर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात संपर्क साधून सल्ले देण्याची गरज त्याने व्यक्त केली. आपण प्रत्यक्ष संपर्क साधत मदत करणाऱ्या व्यक्तींपैकी असल्याचेही तो म्हणाला. जेव्हा जगासमोर सल्ले देण्यात येतात. त्याला महत्त्व नसते. ज्यांना सल्ले द्यायचे असतील, त्यांनी आपल्याशी संपर्क साधत ते द्यावे. सर्वांसमोर दिलेले सल्ले माझ्या काय कामाचे, असा सवालही त्याने केला.
मी माझे काम प्रामाणिकपणे करतो. लोकांच्या सल्ल्यांनी किंवा बोलण्याने मला फरक पडत नाही, असे मी म्हणणार नाही. मी प्रामाणिकपणे मेहनत करतोय. देव त्याचे फळ निश्चित देईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.




























































