
महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून जनतेची सेवा करतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी आणि होम व्हिजिट यावरून शिंदे-फडणवीस सरकाला लगावला आहे.
आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काही ना काही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप कोणीतरी व्हॉट्सअॅप वर पाठवला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी वेळ मागत आहे. पण वेळ दिली जात नाही. याचा अर्थ अडीच महिन्यांपासून प्रशासन ठप्प आहे. हे सरकार ज्या पद्धतीने सांगितले जाते ओरबाडून, दडपशाही करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं. त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे. प्रशासनाबरोबर काम करणाऱया मंत्र्यांचीही राज्याला गरज आहे. मात्र, आजकाल 50 खोके, एकदम ओके हेच दुर्दैवाने ऐकायला मिळत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.






























































