लातूरात गुजरातच्या चोरट्यास पकडण्यात यश; अडीच लाखांची बॅग पळवण्याचा प्रयत्न फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाळत ठेवत व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना व्यापाऱ्याने प्रतिकार केल्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. तसेच नागरिकांनी दाखवलेल्या धैर्यामुळे एकाला पकडण्यात यश आले. तो गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात महावीर बालचंद पोकर्णा (रा. हत्ते नगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दुकान बंद करून ते आपल्या घरी निघाले होते. अपार्टमेंटमध्ये गाडी लावत असताना स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारला. त्यावेळी इतर दोघे दुचाकीवर तिथे आले होते. अचानक दोघांनी त्यांच्या हातामधील अडीच लाख रुपयांची बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बॅग सोडली नाही. जोरजोरात ओरडल्यामुळे दुचाकीवरील दोघे पळून गेले, तर स्कुटीवरुन आलेला एक जण पळून गेला. मात्र एकाने त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न केला असता अपार्टमेंटमधील लोक आले आणि त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याला गांधी चौक पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

राजेश हरीया तमाईचे (रा. गुबेर नगर, सिंगलचाली, अहमदाबाद) असे अटक केलेल्याचे नाव होते. त्याचे इतर तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. गांधी चौक पोलीस ठाण्यात चारजणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.