मालिकांचा बॅण्डबाजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजय कुळकर्णी

सर्व वाहिन्यांवरून ज्या मालिका प्रसारित होताहेत त्यात प्रामुख्यानं गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कथानकात त्याची पेरणी ही केलेली दिसतेय, नव्हे ती प्रामुख्याने दिसली आहे. काहींच्या घरी अजून श्री गणेश आलेले नाहीत, तयारी सुरू आहे आणि गौरीगणपतीचे विसर्जन झाल्यावरसुद्धा ते पाहिलं. खरं तर सार्वजनिक गणपतीचं विसर्जन झालेले आहे, पण वाहिनीवरच्या मालिकेत श्री गणेश येताहेत हे जरा खटकतंच.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या घरच्या गणपतीचे विसर्जन बुधवारी झालं. श्रावण महिना संपलेला होता तरी मालिकेत मंगळागौरी सुरू होत्या. कथानकात त्या त्या सणांची वर्णी लावतात. उद्देश एकच असावा की, हल्लीच्या तरुण पिढीला सणांचे महत्त्व कळावं. हे जरी स्तुत्य असलं तरी ज्या महिन्यात ते ते सण येतात, त्या महिन्यात योग्य त्या सणांच्या दिवशी ते दाखवावेत. पण दाखवतात तेव्हा ते सण संपलेले असतात. मग तो दाखविण्याचा एवढा अट्टहास कशासाठी? वाहिनीला त्याचे फक्त चित्रीकरण करायचे असते. त्याचं नियोजन त्या त्या वेळेत केले तर त्यात अधिक जवळीक निर्माण होईल. हे सर्व त्या त्या वाहिनीवरच्या प्रोग्राम हेडवर अवलंबून आहे. त्यांनी त्याबाबतीत विचार करणं गरजेचं आहे. पाहू या, नवरात्री उत्सवात त्याची अंमलबजावणी होते का?

कलर्स मराठावरील ‘भाग्य दिले तू मला’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘जीव माझा गुंतला’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांमध्ये श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत गणेशाचं आगमन झालं आणि विसर्जनसुद्धा पाहिलं. कथानक पुन्हा अप्पूवर फिरलं, असो. प्रत्येक वाहिनी त्यांच्या सोयीनुसार मालिकेत श्री गणेशाचं आगमन करताना दिसली आहे. आता ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील चिंगीला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं होतं. आनंदीचीसुद्धा तीच इच्छा होती. राघव दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनाला घेऊन गेला. या मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर त्यांचे अनुभव सांगताना म्हणतात, ‘लालबागच्या राजाचा विजय असो’ ही घोषणा करत, ऐकत गिरणगावात बालपण गेलं. राजाचा आशीर्वाद कायम पाठीशी असायचा. तोच आताही आहे. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या इथे मालिकेचं चित्रीकरण आहे ही गोष्ट कुणालाही सांगितल्यावर अशक्य वाटली. अर्थातच भाविकांची राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी, त्याची सगळ्यांना असलेली ओढ यामुळे सगळ्यांना असं वाटून गेलं, पण लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं आमच्या या मालिकेचं चित्रीकरण झालं.

अशा मालिका पाहताना प्रेक्षक जरा पंटाळलेत असं दिसून येतं. ऐन रंगात आलेल्या कथानकाचा त्यामुळे बेरंग होतो असं त्यांचं म्हणणं आहे. यावर वाहिनीवाले विचार करणार आहेत का? हाच खरा प्रश्न आहे.