
पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना गुरुवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मानवी तस्करी प्रकरणी पटियाला येथील ट्रायल कोर्टाने दलेर मेहंदी यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 2003 च्या खटल्यात पटियाला कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दलेर मेहंदी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील मान्य करण्यात आले आहे. दलेर मेहंदी यांना 16 मार्च 2018 रोजी पटियाला कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर दलेर मेहंदी यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पटियाला यांच्यासमोर अपील दाखल करून अपीलाला आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणीला सुमारे चार वर्षे लागली. न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्याने दलेर मेहंदी यांना दिलासा मिळाला नाही.
यानंतर दलेर मेहंदी यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान दिले. शिक्षेविरुद्ध अपील प्रलंबित असेपर्यंत आपल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाकडे केली. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागवले होते. राज्य सरकारकडून मिळालेल्या उत्तरानंतर या प्रकरणावर आज सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले.
























































