बॉम्ब बनवणे आणि स्टेनगन चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेले कै. स्वातंत्र्यसैनिक हनुमंताचार्य संदीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे योगदान असणारा तिरंगा ध्वज फडकावणेही गुन्हा असणाऱ्या हैद्राबाद संस्थानामध्ये क्रांतिसाठी थेट बॉम्ब बनवण्याचे आणि स्टेनगन चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण होते. त्यामध्ये कै. स्वातंत्र्य सैनिक हनुमंताचार्य संदीकर यांचे नावही प्रामुख्याने घेतले जाते.

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा ही त्यांची जन्मभुमी. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सुरु झालेल्या चळवळीच्या माध्यमातून ते स्वातंत्र्यचळवळीत जोडले गेले. स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यापासून अधिक जोमाने त्यासाठी कार्य सुरु केले होते. हैद्राबाद संस्थानवर निजामाची राजवट होती. स्टेट काँग्रेसच्या स्थापनेनंतर भुमिगत राहून हनुमंताचार्य संदीकर यांनी स्वयंसेवक म्हणून काम सुरु केले. हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेतील सहभाग घेतलेला. लातूर येथील रझाकारांच्या हल्यात दोघे शहिद झाले तेंव्हा हनुमंताचार्य संदीकर यांनी थेट चिंचोली कॅम्प गाठला आणि सशस्त्र लढ्यासाठी त्यांनी थेट बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. स्टेनगन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. एक प्रशिक्षीत सैनिक म्हणून त्यांचा दबदबा होता. चिंचोली कॅम्प मधून त्यांना पुढे कासेगाव येथे पाठवण्यात आले. नंतर वागदरी कॅम्प, अक्कलकोट कॅम्पवर त्यांनी स्कॉट कमांडर म्हणून सेवा बजावलेली होती.

सरहद्दीच्या आतील 62 खेडी स्वतंत्र घोषित करुन प्रतिसरकार स्थापन करण्यात आले. त्याचे प्रमुख कॅप्टन जोशी होते. प्रतिसरकाचे कामही त्यांनी केलेले होते. जवळपास सहा महिने प्रतिसरकार चालवण्यात आले होते. त्यांची संरक्षण व्यवस्था स्वतंत्र होती, न्यायालय होते अशी आठवणही त्यांनी सांगीतलेली.

केवळ सशस्त्र लढण्याचे कामच केले असे नाही तर आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली होती. वागदरी कॅम्पवर असताना त्यांना माहिती मिळाली की अचलेर येथे हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथे असनाऱ्या क्रांतिकारकाच्या बचावासाठी त्यांना अचलेरला पाठवण्यात आले. घोड्यावरुन अचलेरला पोहंचल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळयांचा वर्षाव सुरु झाला. स्टेनगनमुळे नवीन कुमक आली अशी खात्री होऊन निजामी पोलीस, रझाकारांनी माघार घेतली. या लढयात एक जाधव नावाचा क्रांतीकारक मरण पावल्याची आठवणही त्यांनी सांगीतलेली.

स्टेट काँग्रेसचे स्वयंसेवक म्हणूनही त्यांनी काम केले. पॉम्प्लेट छापणे, ते सर्वत्र लावणे, वाटप करणे अशी कामेही त्यांनी केलेली होती. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, फुलचंद गांधी यांच्यासोबत ते कार्यरत होते. कुटूंबात अडकायचे नाही म्हणून त्यांनी पत्नीला नगर येथे नातेवाईकांकडे पाठवून दिलेले होते. स्वातंत्र्यानंतर ते कुटूंबासह लातूरात स्थायिक झाले.

निजामी पोलीस, लष्कर आणि त्यांच्या साथीला असणारे रझाकार यांच्या त्रासामुळे नागरीक भयग्रस्त होते. पोलीस अ‍ॅक्शन सुरु झाली आणि लोकांचा संयम सुटला. आपल्यावरील झालेल्या अन्यायाचा बदला म्हणून नंतर अनेकांनी पुरेपूर बदला घेतला. रक्ताचे पाट गावोगावी वाहिले. रझाकारांना ठेचून मारण्याचे कामही केले.

स्वराज्यासाठी धडपड केली, राष्ट्राचे पाईक म्हणून काम केल्यानंतर जी परिस्थीती उद्भवली त्यातून निराशावाद दिसून आला. त्यामुळे हनुमंताचार्य संदीकर यांनी ध्यानयोग जवळ केला. 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव केला. त्याचप्रमाणे 1979 मध्ये आदर्श शिक्षक म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक हनुमंताचार्य संदीकर या नावापेक्षाही ते जोतिषाचार्य संदीकर गुरुजी म्हणूनच सर्वत्र ओळखले जाऊ लागले होते. सन 2002 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतू आजही संदीकर गुरुजी हे नाव मात्र लातूरात अजरामर झालेले आहे.
फोटो. हनुमंताचार्य संदीकर गुरुजी.