
आपल्यासह शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देणारे शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि त्यांचे साथीदार जयवंत हारुगले व उमेश रेळेकर यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मोर्चाद्वारे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात केली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना निवेदन देण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत क्षीरसागर यांच्या स्वागत मंडपासमोर फिरंगाई तालीम मंडळाने शिवसेना गाण्यावर ठेका धरला होता. मात्र, यावेळी अश्लील हावभाव आणि शब्द वापरल्याचा ठपका ठेवत या मंडळाचे अध्यक्ष असलेल्या शिवसेना शहरप्रमुख रविकरण इंगवले यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर शिंदे गटाकडून गुरुवारी सूडबुद्धीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज मिरजकर तिकटी येथून मोर्चा काढून शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली. यावेळी शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह हर्षल सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुवाहाटी येथून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत ‘तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे, तुला सोडणार नाही’ अशा पद्धतीने ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या प्रकाराबाबत ‘मी तेथे असतो, तर ठोकून काढले असते’ असाही धमकीचा व्हिडीओ क्षीरसागर यांनी प्रसारित केला. बुथसमोर शिवसैनिकांनी गद्दारीबाबत घोषणा दिल्याने राजेश क्षीरसागर यांच्यासह जयवंत हारुगले, उमेश रेळेकर हे त्यांचे साथीदार शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे आपल्या जीवितास धोका असल्याने क्षीरसागरसह तिघांवर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.































































