नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडले! सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा ठसका थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. एकीकडे स्वतः मुख्यमंत्री दिल्लीतून त्यावर प्रतिक्रिया देत होते, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्या पद्धतीने प्रसिद्धीमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देत होते त्यावरून नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले हेच दिसून येत आहे. त्यांच्या मुलांनी आधी सगळी कामे बाजूला ठेवून त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा इतका धडाकेबाज झाला की, त्याचा ठसका अगदी दिल्लीपर्यंत पोहोचला. त्याचा परिणाम म्हणजे दिल्लीतून शिवसेना पक्षप्रमुखांच्या एका एका वाक्याचे उत्तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसऱयाकडून लिहून घेऊन वाचावं लागलं. पण तो ठसका शिंदेंनाच लागला असे नाही तर तो तत्काळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचला आणि दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली. पण या सगळय़ांमध्ये नारायण बोलले नाहीत तरच नवल. कारण राणेंचे पुनर्वसन भाजपने एकाच अटीवर केले आहे की बाकी काही काम केले नाही तरी चालेल, मतदारसंघाकडे नाही बघितले तरी चालेल, पक्षवाढीसाठी काही नाही केले तरी चालेल, पण उठता-बसताना, खाताना-पिताना, चालताना-बोलताना, उद्धव उद्धव उद्धव हा जप त्यांनी केला पाहिजे. त्यात त्यांचा ‘अधीश’ बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा हायकोर्टाचा आदेश निघालेला. त्यामुळे आता वाचवेल कोण, असा प्रश्न त्यांना पडला आहे. किरीट सोमय्या अजूनपर्यंत हातोडा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. सोमय्यांना कोकणापर्यंत हातोडा घेऊन जायला वेळ मिळतो, पण मुंबईतल्या मुंबईत हातोडा घेऊन ते पोहोचलेले नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या हातातला हातोडा आपल्या बंगल्यापर्यंत पोहोचू नये, सोमय्यांना भाजपने थोपवून धरावे म्हणून भाजपची मेहरनजर व्हावी यासाठी राणेंचे आटोकाट प्रयत्न आहेत. म्हणूनच ज्या पद्धतीने राणे माध्यमांवर गरळ ओकत होते, नारायण राणेंचे मानसिक संतुलन ढासळलेय असेच वाटत होते. त्यांना तत्काळ उपचाराची गरज आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी सगळी कामे बाजूला ठेवून आधी आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. गेट वेल सून राणेजी काळजी घ्या, असा जोरदार टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.