
सप्टेंबर महिन्यातही जिह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे जिह्यातील 9 हजार 130 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक राहाता व पारनेर तालुक्यांतील पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास पाठवला आहे. आतापर्यंत जिह्यात वार्षिक सरासरीच्या 121 टक्के म्हणजे 543 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नगर जिह्यात यंदा सप्टेंबर महिन्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका अकोले, कोपरगाव, नेवासा, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर व राहाता या सात तालुक्यांतील शेतपिकांना बसला. या तालुक्यांतील 9 हजार 130 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले.
पावसाने जवळपास 151 घरांची पडझड झाली. यामध्ये जामखेड तालुक्यातील 2, कर्जत 5, कोपरगाव 6, पारनेर 4, संगमनेर 96, शेवगाव 7, श्रीगोंदा 4 व राहाता तालुक्यातील 27 घरांचा समावेश आहे. याशिवाय या तालुक्यातील 275 झोपडय़ांचेदेखील नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यातील 371 कुटुंबांच्या घरांना दोन दिवस पुराच्या पाण्याचा विळखा होता. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे.
या अतिवृष्टीत 30 जनावरे दगावली आहेत. यामध्ये 10 मोठय़ा जनावरांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील 2, कोपरगाव 2, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहुरी, राहाता व संगमनेर या तालुक्यांतील प्रत्येकी एका जनावराचा समावेश आहे. दगावलेल्या 20 लहान जनावरांत पारनेर तालुक्यातील 12, संगमनेर तालुक्यातील 5, श्रीगोंदा 2 व कोपरगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
तालुकानिहाय शेतपिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये)
अकोले ः 2 हजार 490 हेक्टर, कोपरगाव ः 412, नेवासा ः 369, पारनेर ः 2 हजार 685, संगमनेर ः 58.8, श्रीरामपूर ः 400, राहाता ः 2 हजार 715 हेक्टर.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
z खरीप हंगामाची पेरणी अहवाल कृषी विभागाने अंतिम केला आहे. जिह्यात खरिपाच्या 6 लाख 40 हजार हेक्टवर पेरण्या झाल्या आहेत. मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसताना दिसत आहे. राहाता, श्रीगोंदा, जामखेड, श्रीरामपूर आणि पारनेर तालुक्यात कपाशी आणि मक्यावर तुडतुडय़ा, बोंडअळी आणि नवीन अमेरिकन लष्कारी अळीचा विळखा पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱया पावसामुळे खरीप हंगामात बहरलेली पिके आता सडण्याच्या मार्गावर आहे.
23 सप्टेंबरपर्यंत नगरला ‘यलो अलर्ट’
z बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, नगर जिह्यातही 23 सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, नगर जिह्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. नगर, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली, अकोले, संगमनेर, राहात्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.































































