पावसाने उघडीप दिल्याने लाल कांदा लागवडीला वेग, पारनेरमध्ये ज्वारी व कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने सलग तीन दिवस उघडीप दिल्याने रखडलेल्या ज्वारीच्या पेरणीला तसेच कांदा लागवडीला वेग आला आहे. जमिनीत वाफसा झाल्याने शेतीची इतर कामे उरकण्यासाठी शेतकऱयांची धांदल उडाली आहे. यंदा पावसामुळे कांदा लागवड आणि ज्वारीच्या पेरण्यांना महिनाभराचा उशीर झाला आहे. त्यामुळे कांदा आणि ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

पारनेर तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱया पंधरवडय़ात लाल कांद्याच्या लागवडीला सुरुवात होते. रोपांची उपलब्धता तसेच पुढील किमान चार महिने पुरेल एवढय़ा पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन साधारण महिनाभर कांद्याची लागवड सुरू असते. कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. पठार भागावरही पाण्याच्या उपलब्धतेनुसार कांदा लागवड केली जाते. तालुक्यात दरवर्षी सुमारे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर लाल कांद्याची लागवड केली जाते.

यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने कांदा रोपे तयार करण्यासाठी जून महिन्यात टाकण्यात आलेले कांदा बियाणे वाया गेले. उगवून आलेली रोपे सडली. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले. तसेच, पुन्हा रोपे तयार करण्यासाठी बियाणांचा व मशागतीचा भुर्दंड शेतकऱयांना बसला. दुसऱयांदा तयार करण्यात आलेल्या रोपांनाही सप्टेंबर महिन्यात सलग तीन आठवडे सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला. रोपांची उगवण कमी झाली. उगवलेली रोपे काही प्रमाणात सडली, तर काही ठिकाणी उताराच्या जमिनीवरील रोपे वाहून गेली. त्यामुळे लागवडीसाठी कांद्याच्या रोपांत मोठी घट झाली आहे.

साडेतीन किलो बियाणांच्या रोपांपासून सर्वसाधारण परिस्थितीत एक एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते. मात्र, यावर्षी रोपे सडल्याने तसेच उगवण कमी झाल्याने साडेतीन किलो बियाणापासून तयार झालेल्या रोपांमध्ये अर्धा एकर कांदा लागवड होईल किंवा नाही, याबाबत शेतकऱयांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे कांदा लागवडीत यावर्षी मोठी घट होणार आहे.

ज्वारी हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. श्रावणी पोळा झाल्यानंतर लगेचच ज्वारीच्या पेरणीला सुरुवात होते. काही शेतकरी मुगाची काढणी झाल्यानंतर पुन्हा जमिनीची मशागत करून ज्वारीची पेरणी करतात. उत्तरा नक्षत्र ज्वारीच्या पेरणीला अनुकूल असल्याचा शेतकऱयांचा अनुभव आहे. यावर्षी मात्र ज्वारीच्या पेरणीला पावसामुळे उशीर झाला. संततधार पाऊस, वाफसा नसल्याने ज्वारीची पेरणी रखडली. आता जमिनीत वाफसा झाल्याने पेरणीला सुरुवात झाली असली, तरी उत्तरा नक्षत्राचे अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे उशिराने पेरलेल्या ज्वारीचे उत्पादन कमी होण्याची भीती आहे. परिणामी ज्वारीची पेरणी करावी किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीत काही शेतकरी आहेत.

मशागतीचा खर्च वाढला

संततधार पावसामुळे जमिनीत मोठय़ा प्रमाणावर तण उगवले आहे. पावसामुळे वेळेत तणनाशक फवारणी करता आली नाही. तणाची वाढ झाली आहे. त्यामुळे तणनाशकांचा फारसा उपयोग होणार नाही. मोठय़ा प्रमाणावर वाढलेले गवत मोठा खर्च करून खुरपण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱयांसमोर नाही. सततच्या पावसामुळे पाणीसाठय़ांमध्ये चांगली वाढ झाली असली, तरी मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.