थेंबे थेंबे तळे साचे – क्रेडिट कार्डमुळे वाढते महागाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रांजल कामरा, सीईओ – फिनोलॉजी व्हेंचर्स

होय! तुमचे क्रेडिट कार्ड जास्त महागाईचा मार्ग खुला करत आहे. नक्कीच, हे व्यवहार सोयिस्कर बनवते, सुरक्षितता सुनिश्चित करते, पण त्याचबरोबर रिवॉर्ड मिळविण्याचीदेखील ही एक उत्कृष्ट संधी आहे, परंतु क्रेडिट कार्ड कंपन्यांचे आपल्या समोर असलेले मॉडेल त्यापेक्षा बरेच काही देते.

क्रेडिट कार्ड वापरणाऱया बहुसंख्य लोकांकडे पुरेसे पैसे नसावेत असा तुमचा विचार होणे स्वाभाविक आहे, पण खरे सांगायचे तर 45 दिवसांसाठी बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी व्याज मध्यस्थ म्हणून क्रेडिट कार्डचा मोठय़ा प्रमाणात वापर करणारे श्रीमंत लोक आहेत आणि त्यांची निवड मुख्यतः कोणती क्रेडिट कार्ड कंपनी जास्तीत जास्त रिवार्ड देते यावर आधारित असते.

पण या कंपन्या एवढा मोठा पैसा मोठय़ा बक्षिसांवर कसा खर्च करतात? बरं, हे सर्व मर्चंट डिस्काऊंट रेटबद्दल असून जे कार्ड मर्चंटकडे स्वाइप केल्यानंतर त्यावर आकारले जाणारे शुल्क (बहुतांश 2-4 टक्के) असते. उदाहरणार्थ, ‘अ’ ही क्रेडिट कार्ड कंपनी किराणा वस्तूंवर 2-4 टक्के सूट देत आहे. एखादी व्यक्ती ‘अ’ कंपनीचे क्रेडिट कार्ड वापरून ‘ब’ किराणा दुकानातून किराणा सामान खरेदी करते आणि 4 टक्के सूट मिळवते. मग आता अंदाज करा की, कोणाचे 4 टक्के नुकसान झाले आहे? अर्थात ‘ब’ किराणा दुकानाचे! शेवटी, क्रेडिट कार्ड कंपनीला सवलतीची रक्कम द्यावीच लागेल, पण ‘अ’ कंपनीचे क्रेडिट कार्ड वापरून किराणा माल खरेदी करणाऱया  प्रत्येक ग्राहकामागे किराणा दुकानाला इतका तोटा सहन करावासा का वाटतो? उत्तर सोपे आहे. कारण तुम्हाला ‘ब’ किराणा दुकानात सवलत न मिळाल्यास तुम्ही ग्राहक म्हणून दुसऱया दुकानात जाल. तर हे चक्र अशा प्रकारे पुढे चालू राहते. व्यापारी क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून आकारले जाणारे शुल्क भरण्यास सहमत आहेत; क्रेडिट कार्ड कंपनीकडून ग्राहकाला रिवॉर्ड म्हणून कमिशन दिले जाते; ग्राहक हा व्यापारी आणि क्रेडिट कार्ड कंपनीशी एकनिष्ठ राहतो.

चला, आता आपल्या तरुणांच्या आवडत्या अॅपल उत्पादनांच्या उदाहरणाद्वारे तुमचे क्रेडिट कार्ड महागाईचा मार्ग कसा खुला करत आहे हे समजून घेऊ.

काही ग्राहक 6-7 टक्के रिवॉर्ड देणाऱया ‘झेड मोबाईल’ या मर्चंट स्टोअरमधून आपले त्याच कंपनीचे प्रीमियम क्रेडिट कार्ड  आयफोन आणि आयपॅड खरेदी करतात. अॅपल उत्पादनांच्या विक्रीवर झेड मोबाईलचे मार्जिन 8 टक्के असेल तर मर्चंट सवलत दरापोटी क्रेडिट कार्ड कंपनीला द्याव्या लागणाऱया रकमेमुळे यातील झेड मोबाईलला 5-6 टक्के कमिशन गमवावे लागेल. हा 1-2 टक्के व्यापारी महसूल पुरेसा नाही, बरोबर ना? साहजिकच, झेड मोबाईलसारखे व्यापारी वितरकांना आणि अप्रत्यक्षपणे अॅपलला त्यांचे नफ्याचे अंतर (मार्जिन) 10 टक्क्यांनी किंवा अॅपल उत्पादनांची किंमत वाढवण्याची विनंती करतात. आता अॅपलला व्यापाऱयांचे मार्जिन 2 टक्क्यांनी वाढवायचे असेल तर ते उत्पादनांच्या किमतीत किमान 2 टक्के वाढ करतील आणि त्यामुळे महागाई वाढेल! अशा क्रेडिट कार्डमुळे रिवॉर्ड महागाईचे संकट दागिने, किराणा सामान इत्यादींच्या बाबतीतही दिसून येते.

थोडक्यात, महागाईची साखळी ही अशी वाढत जाते. व्यापारी वितरकांना त्यांचे मार्जिन वाढवण्यास भाग पाडतात. वितरकांचा मग कंपन्यांवर दबाव आणतात. कंपन्या मग सर्व सहभागीदारांचे मार्जिन सुधारण्यासाठी उत्पादनाची किंमत वाढवतात.

सर्वसामान्य ग्राहकांना फटका

शेवटी याचा सर्वाधिक फटका बसतो तो सर्वसामान्यांना. विशेषकरून ही उत्पादने कोणत्याही डेबिट/क्रेडिट कार्ड रिवॉर्डशिवाय खरेदी करायची असलेल्या सामान्य ग्राहकाला. सवलतींचा लाभ अतिश्रीमंतांच्या खिशात जातो. व्यापाऱयांच्या फायद्यासाठी उत्पादनांच्या किमती वाढवल्या जातात. या चक्राच्या बाहेर असलेल्या ग्राहकांना उत्पादने फुगलेल्या किमतीत खरेदी करण्याची वेळ येते. थोडक्यात सांगायचे तर, हे विलंबित रकमेवरील आकारले जाणारे व्याज नाही, जे क्रेडिट कार्ड कंपन्यांना अतिरिक्त महसूल मिळविण्यास सक्षम करते, तर व्यवसाय चालवण्यास मदत करणारे मर्चंट सवलत दर आणि  ग्राहकांचे रिवॉर्ड यांचे छुपे पॅरामीटर्स! याला श्रीमंत आणि उच्च-मध्यमवर्गीयांच्या सोयीचे नाटक म्हणा किंवा बहुसंख्यांना गरिबीच्या संकटात ढकलणारा महागाईचा पाश म्हणा. शेवटी काय तर क्रेडिट कार्ड कंपन्या या दुधारी तलवारीप्रमाणे काम करतात.