आता त्यांच्या डोक्यावर बसायचंच! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘शिवसेनेची, युवासेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता गद्दारांच्या, विरोधकांच्या डोक्यावर बसायचंच’’ असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी धीरज विनोद ठाकूर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करताना आदित्य ठाकरे बोलत होते.

धीरज ठाकूर हे भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते. भाजपला रामराम करत आज त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेतला. ठाकूर यांच्या शेकडो समर्थकांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकूर हे मूळचे उल्हासनगर येथील आहेत. उल्हासनगर शहरात शिवसेना वाढीसाठी काम करू असे वचन त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवा अधिकारी बाळा श्रीखंडे, उपजिल्हा युवा अधिकारी अॅड. केतन नलावडे, विभागप्रमुख सुरेश सोनावणे, अनिल पुंचे, उपविभागप्रमुख राजू चिकणे, शहर समन्वयक राजेश कणसे, उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू जाधव, रमेश कांबळे, हरी पवार, रुपेश मोहिते, राकेश चिकणे, तुषार बांदल, प्रतिम पाटील आदी उपस्थित होते.