गोव्यात पाणी बिलात वार्षिक पाच टक्के वाढ, विरोधकांची टिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

16 हजार लिटर मोफत पाणी देण्याची योजना राबवणाऱ्या गोवा सरकारने 1 ऑक्टोबरपासून राज्यात पाणीबिलात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टिका केली आहे.

सर्व प्रकारच्या पाणी बिलात ही वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे तसेच यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पाणी बिलात वाढ होणार आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांच्या खिशाला वाढीव बिलाची झळ बसणार आहे. सरकारच्या पाणी बिल वाढीच्या निर्णयावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टिका करत सरकारला धारेवर धरले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला प्रत्येक घरात 16 हजार लिटर पाणी मोफत मिळेल, असे सांगितले होते. याचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यातदेखील करण्यात आला आहे. भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर सहाच महिन्यात याच सरकारने यूटर्न घेत पाणी बिलात वाढ केली आहे. भाजपला मते दिली म्हणून पाणी बिल वाढ करून त्यांना दंड केला आहे, अशी टिका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

आमदारांना विकत घेण्यासाठी आलेला खर्च सरकार गरीब जनतेकडून वसूल करत आहे का, हा प्रश्नदेखील गोमंतकीयांना पडला आहे. त्यामुळे गोव्याच्या जनतेला माझी विनंती आहे की जागे व्हा. दिवसेंदिवस भाजप सरकार तुम्हाला कसे फसवत आहे, याची जाणीव लोकांना व्हायला पाहिजे, असेही विजय सरदेसाई म्हणाले.