
1992 मध्ये मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरवून सोडलेल्या जे. जे. रुग्णालयामधील शूटआऊटप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाविरुद्ध 20 वर्षांनंतर खटला सुरू झाला आहे. आरोपी यासीन मन्सूर मोहम्मद फारुख ऊर्फ फारुख टकला याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात हा खटला चालणार आहे. त्याच्यावर आरोपनिश्चिती करण्यात आली असून न्यायालयाने 19 ऑक्टोबरपासून सरकारी पक्षाला साक्षीदारांना हजर करण्यास मुभा दिली आहे.
दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून दाऊद टोळीच्या शार्पशूटर्सनी 22 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले होते. या प्रकरणात दाऊदचा जवळचा साथीदार फारुख टकला याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त आहे. शूटआऊट घडून वीस वर्षे उलटल्यानंतर त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. न्यायाधीशांनी 19 ऑक्टोबरपासून साक्षीदारांची साक्ष तपासण्यास सरकारी पक्षाला परवानगी दिली आहे. या प्रकरणात एकूण 77 साक्षीदार असून फारुख टकलाविरुद्ध सरकार पक्षाकडून 10 साक्षीदार हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. करण जैन, तर सरकारी पक्षातर्फे अॅड. घोन्साल्विस युक्तिवाद करणार आहेत. शूटआऊट प्रकरणातील इतर सर्व आरोपी यापूर्वीच दोषी ठरले असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.




























































