आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत दोन हत्तींचा वेदनादायक मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील टिटाबारजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसने धडक दिल्याने मादी हत्तीणीचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या मृत मादी हत्तीचे वय 22 वर्षे आणि तिच्या बाळाचे वय 10 महिने एवढे होते. या घटनेत आणखी एक हत्ती देखील जखमी झाला आहे. या जखमी हत्तीची प्रकृती चिंताजनक आहे.

रविवारी रात्री ही घटना घडली, मात्र रात्रभर जखमी हततींजवळ कोणतीही मदत न पोहोचल्यामुळे सोमवारी या हत्तींचा मृत्यू झाला. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना हत्तींच्या हालचालीबाबत सतर्क करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवण्यात आल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ईशान्य सीमारेल्‍वेच्‍या अधिका-यांनी सांगितले की राजधानी एक्‍सप्रेस ताशी 50 किमी वेगाने धावत होती. यावेळी रेल्वे रुळांवर हत्ती दिसताच लोको पायलटने आपत्‍कालीन ब्रेक लावले. मात्र रेल्वेची धडक बसल्याने हत्ती वाचू शकले नाहीत. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने अंधारामुळे हे हत्ती कोणाच्या नजरेस पडले नाही. तर या घटनेबाबत रेल्वे विभागाने अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.