
आईसाठी मूल म्हणजे काळजाचा तुकडा. क्षणभर जरी आई नजरेआड झाली की मूल रडू लागते. पुन्हा आईच्या कुशीत गेल्याशिवाय शांत राहत नाही. कासावीस होते, व्याकुळ होते. अशाच प्रकारे बिबट्याचा एक हरवलेला बछडा आईविना कासावीस झाला होता. बिबट्याचा बछडा असला तरी तो बिबट्यासारखाच गुरकावतो, पण आईविना त्याचे ते गुरकावणेही बंद झाले होते. तब्बल 48 तासांनंतर त्याला त्याची आई पुन्हा मिळाली आणि आईची भेट होताच तो पुन्हा गुरगुरला. मायलेकरांचे हे पुनर्मिलन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाले.
बिबट्याचा हा बछडा 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दादासाहेब फाळके चित्रनगरीत आढळून आला. त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱयांच्या ताब्यात देण्यात आले. आईपासून वेगळा झाल्याने या बछड्याच्या वागणुकीतही फरक जाणवू लागला होता. त्यामुळे त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱयांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्याला अधिक काळ आईपासून दूर ठेवणे त्याच्या जीवितासाठी धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे आईशी पुनर्मिलन व्हावे यासाठी नियोजन केले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्धे आणि पथकाने दक्षिण उपसंचालक रेवती कुलकर्णी आणि सहाय्यक वनसंरक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन्य जिवांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या बछड्याला 10 ऑक्टोबरच्या सायंकाळीच उद्यान परिसरात एका पिंजऱयात ठेवण्यात आले. त्याच दिवशी त्या बछडय़ाची आई पिंजऱयाजवळ फिरताना आढळली, परंतु तिने पिंजऱयाच्या जवळ जाणे टाळले. तिला पाहिल्यानंतर पिंजऱयातील बछडय़ाच्या हालचालीही वाढल्या असे आसपासच्या कॅमेऱ्यांमुळे समजले. 11 ऑक्टोबरला तोच प्रयत्न पुन्हा करण्यात आला. यावेळी कॅमेऱ्याद्वारे बिबटय़ाच्या मादीवर दूरवरून नजर ठेवण्यात येत होती.
12 ऑक्टोबरला पहाटे ठीक 3.45 वाजता बिबटय़ाची मादी पिंजऱयाच्या ठिकाणी आली. ती पिंजऱयाच्या अगदीच जवळ आल्याचे पाहून बचाव पथकाने पिंजऱयाचे दार हळूहळू उघडले. पिंजऱयातून बछडा बाहेर येताच बिबटय़ाच्या मादीने त्याला जवळ घेऊन कुरवाळले. मायलेकराची भेट झाली होती. आईजवळ येताच तो बछडा पुन्हा गुरगुरायला लागला. दोन दिवस त्याने तोंडातून आवाजही काढला नव्हता असे कर्मचाऱयांनी सांगितले. काही वेळानंतर मादी आणि बछडा एकमेकांसोबत जंगलात दूर निघून गेले. बिबट्याची ती मादी म्हणजे आरे दूध वसाहतीमधील सी-33 क्रमांकाची मादी होती. गेल्या वर्षीच तिला रेडियो कॉलर लावण्यात आले होते.






























































