अमित शहांचे राजकीय वय अवघे 20 वर्षे; ‘जेपी’ कोण ते तरी माहीत आहे का? नितीश  यांचा जोरदार पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण (जेपी) यांचे शिष्य सत्तेसाठी काँग्रेससोबत बसले आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. या टीकेला उत्तर देताना जदयू अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. अमित शहा यांची राजकीय कारकीर्द अवघी 20 वर्षांची आहे. ‘जेपी’ कोण होते? हे तरी शहा यांना माहित आहे का? असा सणसणीत सवाल नितीश कुमार यांनी केला आहे.

जयप्रकाश नारायण यांच्या 120 व्या जयंतीच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी नितीश कुमारांवर टीका केली होती. हा कार्यक्रम जयप्रकाश नारायण यांचे मूळगाव असलेल्या सीताबा देयारा येथे झाला. काँग्रेसच्या आणीबाणीला जयप्रकाश नारायण यांनी विशेध केला होता. पण त्यांचे शिष्य सत्तेसाठी काँग्रेससोबत बसले आहेत. नितीश कुमार यांनी पाच वेळा आघाडय़ा बदलल्या, अशी टीका शहा यांनी केली होती.

मी त्यांना महत्त्व देत नाही!

अमित शहा यांच्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारले तेव्हा नितीश कुमार यांनी शहा यांचे नाव न घेता जोरदार फटकारले. ‘तुम्ही ज्यांचे नाव घेता त्यांना प्रत्यक्षात जयप्रकाश नारायण कोण होते हे तरी माहित आहे का? आम्ही 1974 च्या जेपींच्या आंदोलनातून प्रेरणा घेतली. तेव्हापासून आम्ही समाजकारणात आहोत. पण ज्यांची राजकीय कारकीर्द अवघी 20 वर्षांची आहे त्यांना महत्त्व देण्याची माझी इच्छा नाही. माध्यमे त्यांना अधिक महत्त्व देतात. दिल्लीतील इंग्रजी मीडियाने त्यांच्या टीकेला महत्त्व दिले, तरी मी त्यांना (अमित शहा) महत्त्व देत नाही.’