धन धनाधन! एटीएममधून बाहेर आल्या 100 ऐवजी 500 रुपयांच्या नोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीगढमध्ये दिवाळीपूर्वीच एटीएममधून पैशांचा पाऊस बरसला. खैर येथील अग्रसेन मार्केटमधील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या एटीएममधून 100 ऐवजी 500 रुपयांच्या नोटा येऊ लागल्या होत्या. यामुळे बँकेचे अधिकारी हैराण झाले.

एकूण 18 ट्रान्झेक्शनमध्ये एक लाख 96 हजार रुपये जादा निघाल्याने खळबळ उडाली आहे. एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले. 18 ट्रान्झेक्शन करणाऱ्या ग्राहकांची सीसीटीव्ही कॅमेराद्वारे ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आणि त्यांच्याशी संपर्क साधून वसुली करण्याचे कार सुरू झाले आहे.

ही घटना बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये घडली आहे. बँकेचे शाखा मॅनेजर विकास शर्मा यांच्या आदेशाने या एटीएममध्ये 21 ऑक्टोबरला 10 लाख रुपये टाकण्यात आले होते. या सर्व नोटा 500 च्या होत्या. एकूण 2000 नोटा होत्या. 22 ऑक्टोबरच्या रात्री एटीएममधून 18 ट्रान्झेक्शन झाली. त्यातून 100 ऐवजी 500 च्या नोटा आल्या. 23 ऑक्टोबरला मुमताज अली एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्या आणि त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.

धक्कादायक बाब म्हणजे 100 ऐवजी 500 च्या नोटा येत असल्याचे लक्षात आल्यावर दोन ग्राहकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढले. एका ग्राहकाने तर सलग 8 ट्रान्झेक्शन केले. यातून त्याने चक्क 60 हजार रुपये जादाचे काढले. काही ग्राहक हे दुसऱ्या बँकांचे होते. संबंधित बँकांनाही याबाबत कळवण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.