
लक्ष्मीपूजनानिमित्त अनेकांनी आपले किमती ऐवज बाहेर काढून ठेवले असणार. त्यावर डल्ला मारल्यास मालामाल होता येईल. हीच नामी संधी असल्याचे हेरून दोन चोरटे त्यांच्या मोहिमेवर निघाले. एकाने इमारतीमधील दोन घरांतून 23 तोळे सोने चोरले, तर दुसऱयाचा एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न फसला आणि दोघे पकडले गेले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी मुके आणि बहिरे असल्याचे नाटक सुरू केले, परंतु दादर पोलिसांनी त्यांना आपल्या खाक्या दाखवताच त्यांच्या नाटकावर पडदा पडला.
सर्वत्र दीपावलीची धामधूम सुरू होती. प्रभादेवीच्या सयानी रोडवरील नेहा गॅलेक्सी इमारतीमध्ये 25 तारखेला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चंद्रगणेश चेंडू (25) हा घुसला. पाचव्या मजल्यावरील एका घराचा दरवाजा उघडा असल्याने तो आत गेला आणि लक्ष्मीपूजनासाठी काढून ठेवलेले साडेअकरा तोळय़ाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. मग तो त्याच इमारतीच्या तिसऱया मजल्यावर आला. तेथेही एका घराचा दरवाजा उघडा असल्याचे आढळल्यानंतर तो घरात घुसला आणि तेथूनही सोने घेऊन तो पळाला. दरम्यान, तो घराबाहेर पळून जात असताना घरच्यांना ते समजले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करत लगेच 100 नंबरवर कॉल करून सांगितले. मग इमारतीमधील नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून चंद्रगणेशला परळ एसटी डेपोजवळील सिग्नलजवळ पकडले, तर त्याच सुमारास दुसरा आरोपी किरण मुर्गेश (19) याने खाडय़ातील एका इमारतीत दरवाजा उघडा असलेल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. परिसरात फिरत असताना नागरिकांना तो संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. दादर पोलिसांनी तेथे धाव घेऊन किरणलादेखील पकडले.
…मग कन्नडमध्ये बोलू लागले
चंद्रगणेश आणि किरण यांना पोलिसांनी पकडल्यानंतर ऐकू आणि बोलू येत नसल्याचे दोघे नाटक करू लागले. पोलिसांनी दोघांची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा ते नाटक करीत असल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक मुगूटराव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रामकृष्ण सागडे तसेच अजित महाडिक, गणेश माने या पथकाने मग दोघांनाही पद्धतशीरपणे बोलते केले. चंद्रगणेश याने चोरलेले 23 तोळे सोन्याचे दागिने एका पिशवीत गुंडाळून सयानी रोड परिसरात असलेल्या मटकर हाऊस इमारतीच्या जिन्याखाली फेकले होते. ते दागिने पोलिसांनी हस्तगत केले. मुक्या बहिऱयाचे नाटक केल्यानंतर दोघेही आता कन्नड भाषेत बोलू लागलेत.
































































