
>> आरती देवगावकर
दिवाळीचा फराळ असो किंवा इतर काही, त्याच्याशी अगणित आठवणी जोडलेल्या असतात- त्या कधी गावांच्या, माणसांच्या, वातावरणाच्या असतात; कधी सुखाच्या तर कधी दुःखाच्या असतात; कधी रोमांचित करणाऱया तर कधी अंगावर शहारा आणणाऱया… त्या सगळय़ाच्या बरोबर आयुष्य कंठणे क्रमप्राप्त असते.
येणार येणार म्हणत दिवाळी आली आणि गेली. मनामनात प्रकाशाची झाडे लावून, त्यावर आनंदाची फुले फुलवून दिवाळी सरली. प्रत्येकाने आपापल्या परीने दिवाळी साजरी केली. गेली काही वर्षे एक ट्रेंड दिसून येतो आहे. समाजमाध्यमांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राचे त्याला वावडे नाही. वैयक्तिक बाबी काय मर्यादेपर्यंत व्यक्त करायच्या याचेही काहींचे भान हरवले आहे, असे दृष्टोत्पत्तीस येते आहे. मात्र याचे सकारात्मक उपयोग करून घेणारेही अनेक जण आहेतच. त्यांच्या माध्यमातून कित्येक नव्या विषयांना तोंड फोडले जाते, जगभरात कुठे काय चालले आहे याचा आढावा घेता येतो. आपल्याला ठाऊक नसलेल्या कित्येक गोष्टी घरबसल्या समजतात, इ. अनेक गोष्टी आहेत. मात्र आजच्या लेखाचा विषय तो नसून या माध्यमावर दिवाळी कशी साजरी झाली हा आहे. विशेषतः खाण्याच्या बाबतीत!
दिवाळी जवळ आली की, वेध लागतात ते साफसफाईचे. जशा जाहिराती येतात तशाच काही नेटकऱयांकडून कमी श्रमात व्यवस्थित कामे कशी करावीत याच्या टिप्स मिळू लागतात. छोटय़ा छोटय़ा रील्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम कसे करायचे हे पाहता येते. घराच्या सजावटीबद्दलही तेच म्हणता येईल. दिवाळीत सगळय़ात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फराळ. कुणी कितीही म्हणत राहू दे, “आता फराळाचे अप्रूप राहिले नाही. पूर्वी फक्त महालष्म्या आणि दिवाळीत बनवला जाणारा फराळ आता सहजी वर्षभर उपलब्ध असतो. दुकानातून आणता येतो, घरी सतत काही न काही बनत असते… इ. इ.’’ ‘तरीही दिवाळीत फराळाची जी लज्जत असते ती एरवी जरा कमीच, नाही?’ असं म्हणत घरोघर त्याची तयारी सुरू होते.
आता तुम्हाला वाटेल, हे तर माहितीच आहे, तुम्ही नवे काय सांगताय? तर नवे असे नाही; पण समाजमाध्यमांचा यातील वापर कसा होतो हे यावेळी जरा लक्षपूर्वक पाहिले गेले म्हणून शेअर करावेसे वाटले इतकेच! इथे जाहिरात करून आपापला फराळ, काही विशेष पदार्थच असे विक्रीसाठी ठेवणारे शेकडो लोक होते. त्याचबरोबर दरवर्षी करायचे पदार्थ असूनही घरोघरच्या सुगरणींनी समाजमाध्यमावर फराळ बनवायच्या आपल्या शंका विचारल्या, कुणी बिघडलेले पदार्थांचे फोटो टाकून किंवा काय होते आहे हे सांगून त्यात काय सुधारणा करता येईल हे विचारले, तर कुणी निगुतीने केलेल्या आपल्या छानशा पदार्थांचे फोटो दाखवले. कित्येकांनी चांगल्या प्रकारे शंका समाधान केले. काय बिघडले असावे याचा अचूक अंदाज वर्तवत पदार्थ कसा सुधारता येईल याबाबतीत मार्गदर्शन केले. अगदीच सुधारणेच्या पलीकडे काही बिनसले असेल तर त्यापासून नवीनच काय तयार करता येईल याच्याही सूचना दिल्या. यामध्ये हमखास बिघडू शकणारा लाडूचा पाक जसा होता (त्याने एक तर लाडूचा भगरा होतो किंवा कितीही मुरले तरी वळता काही येत नाहीत, ते मिश्रण मऊच राहते) तसेच तेलात टाकल्यावर चकली विरघळते आहे / काटा मोडतो आहे, अनारसे तुपात हसतायत, चिरोटय़ाला पदर सुटले नाहीत, चिवडय़ाचे पोहे कुरकुरीत करताना आक्रसू नयेत म्हणून काय करू, साठा हाताने फेसावा की मिक्सरवर… अशा जेन्युईन क्वचित कुणाला बाळबोधही वाटू शकतील अशा अक्षरशः शेकडो प्रकारच्या शंका आणि त्याला तेवढीच किंबहुना त्याच्या काही पटीत उत्तरे दिली जात होती. एकीकडे वाचताना मजाही येत होती आणि ज्ञानात कितीतरी भरही पडत होती. त्यामुळे हातात भरपूर काम असतानाही दिवसातला थोडासा वेळ का होईना, मीसुद्धा तिथे घालवत होते.
वेगवेगळय़ा पदार्थांत प्रावीण्य मिळवलेल्या लोकांनी हातचे न राखता आपल्या रेसिपी शेअर केल्या होत्या. त्या करून पाहताना जर कुणी त्यातील एखाद्या पायरीवर अडले तर ते मोकळेपणाने मदत करत होते. हे पाहून खूप छान वाटत होते. पूर्वी कधीतरी एखादी व्यक्ती अशी असायची की, तिला तिच्या पदार्थाचे इंगित अथवा घटक पदार्थ जरी विचारले तरी ती ते सांगत नसे. त्यामागे आपला पदार्थ सगळय़ांपेक्षा वेगळा होतो, तर ती आपलीच खासियत राहावी असा विचार असेल बहुधा; पण शेवटी हाताची चव काही सगळय़ांची सारखी नसते. आपली चव ती आपली चव, हे त्यांच्या का लक्षात येत नसेल देवाला ठाऊक. असो, असतो मानवी स्वभाव म्हणायचे नि सोडून द्यायचे. हे ज्यांना विचारले जायचे त्या व्यक्ती आपल्या परिचितच असत. इथे मात्र कधी न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तींना आपली सर्व गुपिते सांगण्याइतका खुलेपणा समाजमाध्यमावर पाहायला मिळतो हे समाजाच्या दृष्टीने आशादायक आहे.
अर्थात इथे सगळे खूप छानच आहे का, तर नाही. शेवटी माणूस म्हटला की, त्याच्या वृत्ती सगळीकडे थोडय़ाफार फरकाने सारख्याच. कुणी विचारलेल्या शंकांवर काय ही, असे कसे बिघडू शकते, माझे कध्धी बिघडत नाही, इ.’ बडबडणारे शेलके नमुने असतातच. काही वेळा एखाद्या व्यक्तीने खपून केलेल्या पदार्थांच्या फोटोवर किंवा रेसिपीवर आमच्या अमक्याची ढमकी हे इतके छान बनवते, जगात तिच्यापेक्षा भारी कुणी बनवूच शकत नाही, अशा तऱहेच्या कमेंट्सदेखील दिसतात. तेव्हा वाटते, ‘अरे काय हे, ठीक आहे! जगातले सगळे पदार्थ तुमच्या घरात, तुमच्या नातलगांकडे सर्वोत्तम बनत असतील; पण आता समोर आहे त्याचे कौतुक मोकळय़ा मनाने करा की! त्याला काय हरकत आहे? तुमचाही मोठेपणाच दिसून येईल.’ पण त्यांना हे सांगणार कोण?
दिवाळीचा फराळ असो किंवा इतर काही, त्याच्याशी अगणित आठवणी जोडलेल्या असतात- त्या कधी गावांच्या, माणसांच्या, वातावरणाच्या असतात; कधी सुखाच्या तर कधी दुःखाच्या असतात; कधी रोमांचित करणाऱया तर कधी अंगावर शहारा आणणाऱया… त्या सगळय़ाच्या बरोबर आयुष्य कंठणे क्रमप्राप्त असते. तसे ते जगताना समजून घेणारे सोबती मिळाले तर प्रवास सुसह्य होतो. कोणताही सण साजरा करण्यामागे लोकांनी एकत्र यावे, त्यातून बंधुभाव- सख्यभाव वाढीस लागावा हाच तर मूळ हेतू आहे. अशा प्रकारे आभासी जगात का होईना; पण काही प्रमाणात तो वाढू लागला आहे, त्यातून मैत्र जुळून काही वेळा ते जिवाजवळचेही होते आहे, हा फार आश्वस्त करणारा भाग आहे. तो तसाच वाढता राहो या नव्या प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा!
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]


























































