पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती, तरुणांमध्ये गोंधळाचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे लटकलेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीकडे असंख्य तरुणांचे लक्ष लागले होते. आता सर्व सुरळीत झाल्याने शासनाने पोलीस भरतीची घोषणाही केली. 1 नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱयांनी भरतीची जाहिरात करावी असे आदेशदेखील जारी झाले. पण अचानक प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेश येईपर्यंत जाहिरात देऊ नये असा नवा आदेश आज जारी करण्यात आल्याने तरुणांमध्ये गोंधळ उडाला आहे.

लटकलेली पोलीस शिपाई पदाची भरती लवकरात लवकर घेणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. आता कोरोनाचे संकट संपलेले असल्याने भरतीचा मार्गदेखील मोकळा झाला असल्याने शासनाने पोलीस भरतीची घोषणा केली. त्यानुसार 1 नाव्हेंबर रोजी संबंधित पोलीस अधिकाऱयांना भरती प्रक्रियेची जाहिरात करण्याचे आदेश देण्यात आले, पण हा आदेश जारी करून एक दिवस पूर्ण होत नाही तोच आता नवा आदेश जारी करण्यात आला आहे. सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. जाहिरात देण्याची पुढील तारीख कळविण्यात येईल, असे राज्याच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी काढलेल्या नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे स्थगितीचा आदेश काढण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरा आदेश निघत असल्याने भरतीसाठी तयारी करणाऱया तरुणांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे. नेमके चाललेय काय हेच समजत नसल्याची प्रतिक्रिया तरुणांमधून येत आहे. आयपीएस अधिकाऱयांच्या बदली व बढती प्रक्रियेतही सकाळ, दुपार, संध्याकाळ असे वेगवेगळे आदेश जारी करण्यात आले होते.