आता दिवे नाही तर मराठीची मशाल पेटवा! खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी असताना महाराष्ट्राचं दिवाळं काढलं जात आहे. महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग्ज पार्क गेला आणि आता टाटा एअरबसचा विमान निर्मिती कारखाना जो नागपूरला होणार होता तोदेखील वडोदऱयाला घेऊन गेले. त्यामुळे आता मराठीत दिवा नाही तर आता मराठीची मशाल पेटवा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केले.

स्वामीराज प्रकाशन आणि सुभाष डामरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘मराठी आठव दिवस’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प एकामागून एक गुजरातला पळविण्यात येत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मराठीत बोला, मराठी चाला असं नुसतं न करता ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ अशा पद्धतीने पेटलेला पाहिजे. मराठी माणूस असे सांगत महाराष्ट्रावर होणाऱया अन्यायाच्या विरोधात पेटून उठा, असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी आपला प्राण अर्पण केला. 1 नोव्हेंबरला बेळगावात, कर्नाटकमध्ये काळा दिवस पाळला जातो. बेळगाव, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र अजून व्हायचा आहे. आताचे ग्रेट मुख्यमंत्री त्यावेळी आंदोलनासाठी जायचे त्यांना विचारा बेळगाव, निपाणी, भालकी, बिदरमधील आमच्या मराठी भाषिकांसाठी काय करणार आहात, असा टोला अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाणे हा मराठी अस्मितेवरचा, मराठी माणसावरचा घाला आहे. मराठीच्या राज्यावरचा घाला आहे. आम्ही गुजरातचे आणि देशातील दोन नेत्यांचे गुलाम होतोय. राज्यात जे सरकार आले त्या सरकारने आल्याआल्या काय केले तर आरेचा प्रोजेक्ट, बुलेट ट्रेन. आता बुलेट ट्रेन कुणासाठी हे कळले का? इकडचे कारखाने तिकडे घेऊन जायचे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे करण्याची हिंमत झाली असती का? आदित्य ठाकरे यांनी दावोसला जाऊन आणलेले प्रकल्प तुम्ही घालवलेत, असा घणाघात अरविंद सावंत यांनी केला.