
मुंबई गोवा महामार्गात साळिस्ते येथे संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा. आपली जमीन संपादित करुन तशी नोंदही महसूल विभागात करण्यात आलेली आहे. मात्र, प्रशासकीय कामातील चुकीमुळे मोबदला देण्यात गेली पाच वर्षे सातत्याने टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे पुढिल एक महिन्यात आपल्याला मोबदला न मिळाल्यास कणकवली उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा जमीन मालक सुधाकर नर यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासन आणि शासनाला दिला आहे.
सुधाकर नर यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि कणकवली उपविभागीय अधिकारी यांना लेखी पाठवण्यात आले आहे. या निवेदनामध्ये ते म्हणालेत की, 2005 पासुन महामार्ग नंबर 66 च्या रुंदीकरणासाठी लागणारी जमीन रितसर मला नोटिस देऊन कायदेशीर कारवाई करुन संपादित करण्यात आली आहे. या संपादित केलेल्या जमिनीची माझ्या सातबारावर नोंद करण्यात आली आहे.
या जमिनीच्या मोबदल्याची कायदेशीर मागणी केली, त्यावेळी उपविभागीय कार्यालयातून मोबदला न देता खोटी आणि अपुरी माहिती देऊन हे प्रकरण मुद्दाम, व्देषाने कोर्टात पाठविण्यात आले. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या घोडचुकीमुळे सन 2017 पासुन प्रांत कार्यालय माझी फसवणूक करुन जमीन बळकावून माझे फारमोठे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे मला आर्थिक, मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे कोर्ट केसेसला हजर राहण्यासाठी माझे शरीर साथ देत नाही. त्यामुळे यापुढे मी कोर्टात जाणार नाही.या पाच वर्षात घडलेल्या सर्व घटनांमुळे सुधाकर नर यांनी शेवटचे लेखी निवेदन देऊन पुढिल एक महिन्यात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अथवा पुर्ववत माझी जमीन मिळावी. अन्यथा कणकवली उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.






























































