खाण्यासाठी करा वर्कआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मृदा झरेकर, डहाणूकर कॉलेज

जास्त वर्कआऊट करा. मग जास्त खाऊ शकाल. जेवढा वर्कआऊट चांगला तेवढय़ा चांगल्या गोष्टी खाता येतील आणि तुम्ही फिट रहाल… सांगताहेत योगेश जाधव.

‘बिग बॉस’ मराठीचे स्पर्धक, सोलापूरची शान असणारे योगेश जाधव घराघरांत पोचले. योगेश जाधव हे फिटनेस प्रशिक्षक आणि मार्शल आर्टिस्ट आहेत. त्यांनी अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील मिक्स्ड मार्शल आर्टस् (एम.एम.ए़ ) स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि त्यात अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

‘बिग बॉस’च्या घरातील खाद्य सवयींविषयी योगेश जाधव म्हणाले, ‘बिग बॉस’च्या घरात आपल्याला जे हवं ते प्रत्येक वेळी नाही मिळू शकत. अंडी, चपाती आणि भात हे रुटिन असायचं. चिकन आणि इतर पदार्थ खूप मिस केले.
अमृता धोंगडे वा मेघा घाडगे यांच्या हातचा स्वयंपाक योगेशला आवडायचा. कणिक मळून देणं, कधी चपाती लाटून देणं अशी कामं ते करायचे. त्यांनी एका टास्कमध्येदेखील 100 चपात्यांचे कणिक मळून दिलं होतं.

योगेश बॅचलर आहेत. ते स्वयंपाक करायला शिकले. स्वतः बनवलेले मटन पाया सूप तर त्यांचं एकदम फेव्हरेट. इतर पदार्थही ते चांगले बनवतात. त्यांच्या रोजच्या डाएटमध्ये 25 अंडी, 500 ग्रॅम चिकन यांचा सकाळ आणि संध्याकाळी समावेश आहे. भाजी, चपाती आणि प्रोटिन्स हे तर आलंच.

‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवलं. स्वतःसाठी खास जेवणाची कोणतीही मागणी केली नाही. आईच्या हातची पिठलंभाकरी, मोदक, साबुदाण्याची खिचडी, कारल्याची भाजी हे पदार्थ योगेश यांना खूप आवडतात. त्यातही कारल्याची भाजी ते फक्त आईच्या हातची खातात. पाणीपुरी, भजी, गुलाबजाम त्यांना आवडते. ‘‘हॉटेलमधली आवडती डिश कोणती?’’ असं विचारल्यावर ते चटकन बिर्याणी सांगतात…आणि बरं का, योगेशला उत्तम चहादेखील बनवता येतो.
चाहत्यांना संदेश देताना योगेश सांगतात, वर्कआऊट करा. खाण्यासाठी जास्तीत जास्त वर्कआऊट करा. मग जास्तीत जास्त खाऊ शकाल. जेवढा वर्कआऊट तेवढय़ा चांगल्या गोष्टी खाता येतील आणि तुम्ही फिट रहाल.