श्रीकृष्णानंतर इतके चमत्कार करणारा हा एकच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघ , धापा न टाकता हसत हसत उपांत्य फेरीत पोहोचला. हा विश्वचषकच वेगळाच आहे. कोण कुणासमोर कधी धापा टाकत जिंकेल आणि कोण कुणाला हरवेल ते कळत नाही. दक्षिण आफ्रिका टीम इंडियापुढे जिंकते आणि नेदरलँडसबरोबर हरते? उगाच ‘चोकर्स’ नाही म्हणत त्यांना. त्यामुळे पाकिस्तान कानामागून येऊन तिखट झाली. पण झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हा एकच गोष्टीसाठी लक्षात राहिलं. सूर्यकुमार यादवची फलंदाजी. या सूर्याच्या बॅटच्या तेजाला आकाश हीच सीमारेषा आहे. त्यापुढे मी सर्व विसरलो. रोहित शर्मा पुन्हा पुलवर बाद झाला हे विसरलो. विराट ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू तो कुठेही फेकू शकला असता हे विसरलो. राहुलने लागोपाठ दोन चांगली अर्धशतके केली हे विसरलो. (लीप इयर लागोपाठ दोनदा येऊ शकतं तर.).

गोलंदाजानी विकेटची द्रौपदी वाटून घेतली हे विसरलो. रायन बर्लने पंतचा घेतलेला अफलातून झेल विसरलो मी. लक्षात आहे फक्त सूर्याचे ते किरण ज्याला आपण फटके म्हणतो. आजपर्यंत टी-20 मध्ये चमत्कार सदराखाली येणाऱया फटाक्यांचा निर्माता ए बी डिव्हिलियर्स असं माझं मत होतं. सूर्याने एक नवा प्रकल्प त्याच्यासमोर उभारला आहे. तो वेगवान गोलंदाजाला खेळताना वाईड बॉल रेषेपर्यंत पाय नेतो आणि तिथून तो चेंडू लाँग लेगला, मेलबर्नच्या सीमापार पाठवून देतो. काय टायमिंग! एकदा नाही. अनेकदा. कितीवेळा डोळे चोळणार? ऑफ स्टंपच्या कितीतरी बाहेरचा चेंडू तो स्क्वेअर लेगच्या प्रेक्षकांत फेकून देतो. त्याचं फटक्यांचं पुस्तकच वेगळं आहे. ते अभ्यासावे , त्याचं काwतुक करावं, कॉपी करायला जाऊ नये. त्यामागे त्याच टॅलेंट आहेच, पण सराव आणि विचारही आहे. तोच त्याचा निर्माता आणि दिग्दर्शक आणि अॅक्टर. आपलं काम रसिक प्रेक्षक होऊन आनंद घेणं. बरं तो जुनी, बाबा आदमच्या काळापासून आलेली फलंदाजीची पुस्तकं विसरलेला नाही. त्याने मारलेला सणसणीत स्ट्रेट ड्राईव्ह गावसकरच्या काळातल्या पुस्तकातला होता. आणि मग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून थेट प्रेक्षकांत मारलेला षटकार त्याच्या पुढच्या काळातला. आता त्याने काळ आणखीन पुढे नेलाय, निदान टी-20 च्या फॉरमॅटमध्ये. वर्षात त्याने टी-20 मध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. आणि स्ट्राईक रेट काय? तब्बल 240. Supersonic वेग. यादवांच्या कुळात श्रीकृष्णानंतर इतके चमत्कार कुणी केले नसतील.