कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनकडे विद्यार्थ्यांचा ओढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इंजिनीयरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा यंदा कॉम्प्युटर इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीयरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मॅकेनिकल इंजिनीयरिंगकडे पाहायला मिळाला. विविध महाविद्यालयांतील या शाखांच्या जास्तीत जास्त जागांवर प्रवेश झाले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (बी.ई/ बी.टेक) अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत राज्यातील 329 महाविद्यालयात यंदा 1 लाख 45 हजार 201 जागा उपलब्ध होत्या. यांपैकी 1 लाख 9 हजार 499 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून प्रवेश घेण्याची मुदत 20 नोव्हेंबरला संपली आहे.

सीईटी सेलकडून प्रवेशाच्या यंदा तीन फेऱ्या राबविण्यात आल्या होत्या. यंदा विद्यार्थ्यांचा कल इंजिनीयरिंगकडे वाढला असून आतापर्यंतचे विक्रमी प्रवेश 2022-23 या शैक्षणिक वर्षात झाले आहेत. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाणही घटले आहे. ज्या अभ्यासक्रमांना पसंती नाही असे अभ्यासक्रम अनेक महाविद्यालयांनी बंद केले आहेत. त्यामुळे रिक्त जागांचे प्रमाण घटले असून यंदा केवेळ 35 हजार 702 जागा या रिक्त राहिल्या आहेत.