
सत्तेसाठी हपापलेल्या कपटी, कारस्थानी, षड्यंत्री लोकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. भविष्यात ‘त्या’ प्रवृत्तींना गाडून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवू, असा निर्धार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. आपल्याला उद्धव ठाकरे यांना पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना पहायचे आहे, त्यासाठीच ही महाप्रबोधन यात्रा असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यभरात सुरू असलेल्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची जबरदस्त सभा आज मुलुंडमध्ये पार पडली. शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. हा निष्ठावान शिवसैनिक जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे तोपर्यंत कितीही गद्दार गेले तरी चिंता नसल्याचे यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी सांगितले. आज देशात पंतप्रधानांसह सत्तेतील सर्वच नेते आपलीच ‘मन की बात’ करत आहेत, पण जनतेच्या समस्या, प्रश्न कोणीच ऐकून घेत नाही. त्यामुळे जनतेला काय वाटतेय हे मांडण्यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ही यात्रा सत्तेसाठी नाही, असेही अंधारे म्हणाल्या.
या महाप्रबोधन यात्रेला आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, उपनेते शिशिर शिंदे, दत्ता दळवी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, विभागप्रमुख सुरेश पाटील, राजोल पाटील, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, युवा सेनेचे शरद कोळी, नगरसेविका सुवर्णा करंजे, दीपमाला बढे आदी उपस्थित होते.
‘मिंधे’ शिवसेनेच्या नावावर वाढलेले बांडगूळ
राज्याचे मुख्यमंत्री असलेले ‘मिंधे’ हे शिवसेनेच्या नावावर वाढलेले बांडगूळ आहेत. त्यांनी आपणच खरे शिवसेनेचे विचार जोपासत आहे अशी टिमकी वाजवू नये. खरी शिवसेना काय आहे हे शिवसैनिकांना माहीत आहे. त्यामुळेच ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

























































