
जगाला अहिंसा आणि शांततेचा महान संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन तत्त्वज्ञानावर आधारित ‘भगवान गौतम बुद्ध’ हे नाटक सुमारे 40 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. योजना प्रतिष्ठान निर्मित नाटकाचा पहिला प्रयोग नागपूर येथे झाला होता. नाटकात योजना शिवानंद यांनी यशोधरेची भूमिका साकारली होती, तर नितीश भारद्वाज यांनी सिद्धार्थची भूमिका केली होती. ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला, 1983 साली योजना प्रकाशनतर्फे या नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यानंतर आता नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या 6 डिसेंबर रोजी होईल.
शिवगंधार आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे अविनाश फणसेकर लिखित ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या वेळी साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, आनंदराव खरात आणि अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज यांची प्रमुख उपस्थिती असेल. हा कार्यक्रम ग्रंथाली प्रतिभांगण, आयडेंटिटी बिल्ंिडग, केन रोड, मन्नत बंगल्याजवळ, बॅण्ड स्टॅण्ड, वांद्रे पश्चिम येथे होणार आहे. या वेळी ‘भगवान गौतम बुद्ध- स्वरवंदना’ ही गाण्यांची मैफिल रंगेल. निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांचे आहे. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

























































