
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचा गौरवशाली जीवनपट उलगडवून पालिकेने अनोखी आदरांजली वाहिली आहे. यामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जन्मापासून त्यांच्या संपूर्ण आयुष्याची जडणघडण, संघर्ष आणि समाजकार्याची माहिती दुर्मिळ छायाचित्रांसह समोर आणली आहे. जनसंपर्क विभागाने संकलित केलेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन आज अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱयातून लाखो अनुयायी येत असतात. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नागरी सुविधा आणि निवारा व्यवस्थेची माहितीही या पुस्तिकेत देण्यात आली आहे. पालिकेच्या ‘पोर्टल’वर ही पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा आणि उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी पालिका मुख्यालय येथून ही माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. ही पुस्तिका मोफत उपलब्ध आहे.
अशी आहे संग्रही पुस्तिका
डॉ. आंबेडकर यांच्या जन्मापासून, शिक्षण, कारकीर्दीची माहिती, बाबासाहेबांचे गुरू, त्यांचे महापरिनिर्वाण
डॉ. आंबेडकरांची सही, पालिकेतील अर्धपुतळा, दादर येथील राजगृह, परळचे निवासाचे दुर्मिळ पह्टो
त्यांचे कुटुंब, राजकीय संबंधांचे छायाचित्रे, बावीस प्रतिज्ञा, यासह चैत्यभूमी परिसरातील सुविधांची माहिती आहे.





























































