
सीमावर्ती असलेल्या अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील भाजपच्या हस्तकांचा वावर वाढला आहे. या हस्तकांनी कट रचून सीमावर्ती गावांतील ग्रामस्थांची माथी भडकावत सीमावाद चिघळवत ठेवण्याचा जोरात प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच आज 11 गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुविधा द्या पिंवा कर्नाटकात समावेश करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, निवेदन देणारे सर्वजण भाजपचे कार्यकर्ते आहेत.
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व सध्या भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख करीत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या आंदोलनाला भाजपातील गटबाजी करणारे पदाधिकारी व कर्नाटकातून आलेल्या हस्तकांकरवी रसद पुरविली जात आहे.
कल्याणशेट्टी, देशमुखांची चुप्पी
राज्य सरकारने मूलभूत सुविधा न पुरविल्यास व मागण्या मान्य न केल्यास कर्नाटकमध्ये जाण्यास ग्रामस्थांची इच्छा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात सीमावर्ती भागात ग्रामस्थांची ओरड सुरू असताना भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व आमदार सुभाष देशमुख भूमिका स्पष्ट करीत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


























































