हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईताविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या सराईताविरुद्ध एमपीडीएनुसार, स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार, केलेली ही 88वी कारवाई आहे. या कारवाईमुळे भाईगिरी-दादागिरी करणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राकेश शंकर ठोकळ (21, रा. खजुरे वस्ती वैदवाडी, हडपसर) असे स्थानबद्ध केलेल्या सराईताचे नाव आहे. राकेश ठोकळ सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांच्या मदतीने हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. कोयता, तलवारीसारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे 6 गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी प्रस्ताव तयार केला.

संबंधित प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविण्यात आला होता. दरम्यान, भाईगिरी-दादागिरी करीत दहशत निर्माण करणार्‍या अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार, स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 88 सराईतांना विविध कारागृहांत जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कायम ठेवण्यास मदत झाली आहे.