तीन महिन्यांत 50 लाख युनिटची वीजचोरी उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीजगळती असलेले 230 फीडर निश्चित करून करण्यात आलेल्या कारवाईला यश आले आहे. केवळ तीन महिन्यांत 50 लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आणण्यामध्ये महावितरणला यश आले आहे. या यशाबद्दल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी व कर्मचाऱयांचे अभिनंदन केले.

महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स ठरविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱयांनी लक्ष केंद्रित केले.

संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, आकडा टाकून वीजचोरी होत आहे का, याची माहिती घेऊन महावितरणच्या कर्मचाऱयांनी कारवाई केली. परिणामी त्या-त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून, 5 दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून, अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीजवापराएवढी ही वीजचोरी पकडण्यात आली आहे.

महावितरणने वीजगळती रोखण्यासाठी आक्रमकपणे काम सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून फीडर्सपैकी वीजगळतीच्या बाबतीत टॉपर्स निश्चित करून कारवाई करण्याची रणनीती आखली. त्या-त्या झोनमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱयांना निश्चित केलेल्या फीडर्सची जबाबदारी देण्यात आली. काही ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत गळती होती, ती वीस टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. तीस टक्के ते पन्नास टक्के गळती असलेल्या फीडर्सची गळती पंधरा टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पहिल्या तीन महिन्यांत मिळालेल्या यशामुळे अधिकाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.