
एटीएम कार्ड बदलून 43 हजार 360 रुपये काढून घेतल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल शेजारी घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप दासराव चिरके (वय 59, रा. बार्शी, जि. सोलापूर) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे.
दिलीप चिरके हे नगर-मनमाड रोडवरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे दोनजण आले. ‘लवकर पैसे काढा, तुम्ही चुकीचे बटण दाबत आहात,’ असे म्हणून त्यांनी चिरके यांना विश्वासात घेतले. त्या व्यक्तीने दिलीप यांचे मशीनमधील कार्ड काढून घेत दुसरे एटीएम कार्ड चिरके यांना दिले. ते एटीएम कार्ड घेऊन चिरके बार्शीतील घरी गेले. यानंतर त्यांना एटीएम कार्ड बदलून आल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून 43 हजार 360 रुपये काढून घेतल्याचा मेसेज त्यांना आला होता. चिरके यांनी पुन्हा नगरला फिर्याद दिली.



























































