वालचंद विद्यालयात 35 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग, गेले ते दिवस अन् राहिल्या त्या आठवणी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल साडेतीन दशकं लोटली… पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं… अनेकांची साथ सुटली, वयं वाढली… पण जुन्या आठवणींनी हळवं होणारं मन शाळेच्या दिवसांकडे ओढ घ्यायचं… जुनी मैत्री पुन्हा जागविण्याची ऊर्मी यायची. यातूनच मग पुन्हा एकदा ‘दहावीचा वर्ग’ भरविण्याची कल्पना निघाली, पण ती कल्पनाच न राहता प्रत्यक्षात आली. मित्र, मैत्रिणी एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या, किस्से, सुख-दुःखांची देवाण-घेवाण झाली. बघता बघता शाळा सुटायची वेळ झाली अन् मग जाणवलं, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. निमित्त होतं वालचंदनगरमधील वालचंद विद्यालय, कळंब शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.

वालचंदनगरजवळील वालचंद विद्यालय कळंब या शाळेतील 1987-88 या सालातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. विद्यालयाचे माजी प्राचार्य, वर्गशिक्षक पांडुरंग साळवे सर प्रमुख पाहुणे होते. तर, माजी शिक्षक रतन कुंभार, रायबा कुंभार, बबन पारठे यांच्यासह प्राचार्य बाळासाहेब सर्वगोड आणि त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात मृत पावलेल्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्नेह मेळाव्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, सांगली येथून आलेले विद्यार्थी शाळेचा कानाकोपरा बघून जुन्या आठवणींमध्ये  रममाण झाले. अनेक वर्षांनी आपल्या मित्रांना प्रत्यक्ष भेटून प्रत्येकजण भारावून गेला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळा आणि शिक्षकांबाबतच्या आठवणी जागवल्या. तसेच ‘आहात त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहून देशासाठी कार्य करत राहा,’ असे माजी प्राचार्य साळवी यांनी सांगितले. तर, प्रत्येक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणातच स्नेहमेळाव्याचे आयोजन करावे. शाळा प्रशासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन प्राचार्य सर्वगोड यांनी केले.

प्रा. पांडुरंग कुचेकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. अशोक रासकर, ऑडिटर रवींद्र पवार, विजय खरात, सुरेखा जाधव, डॉ. भीमराव जानकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मीराबाई काळेल यांनी आभार मानले.