
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण व दिवसेंदिवस लव्ह जिहादचे प्रकार वाढत असल्याच्या निषेधार्थ आज नगर शहरात सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला होता. जय भवानी जय शिवाजी व जय श्री रामाच्या घोषणांनी परिसर हा दुमदुमून गेलेला होता. काजल हिंदुस्थानी व कालीचरण महाराज हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी काजल दीदी यांनी हिंदुस्थानला इस्लामिक देश बनवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा घणाघात केला.
नगर शहरात या मोर्चाचीच चर्चा होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोखपोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलेला होता.
नगर शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या मोर्चाची सुरुवात झाली. माळीवाडा आशा टॉकीज चौक, कापड बाजार, तेलीखुंट,चितळे रोड मार्गे दिल्लीगेट या ठिकाणी हा मोर्चा आला व दिल्ली गेट या ठिकाणी सभेमध्ये त्याचे रूपांतर झाले.
सकाळी अकरा वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा संदर्भामध्ये वेगवेगळे विषय आता पुढे येऊ लागलेले आहे. तसेच दिवसेंदिवस लव्ह जिहादचे प्रकार वाढत चाललेले आहे. यासाठी कडक कायदा करावा अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनेची मागणी आहे.
यावेळी बोलताना काजल दीदी हिंदुस्तानी म्हणाल्या की, जसा कोरोना आला त्याच पद्धतीने लव्ह इज जिहाद हा व्हायरस आला आहे, तो आता हिंदुस्तान शिरला असून त्याचा बंदोबस्त करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे आता हिंदूंनी लक्षात ठेवावं असे त्या म्हणाल्या. घरामध्ये आपण आपल्या पाल्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे जेणेकरून या संस्कारतून चांगली पिढी ही घडली जाईल असेही त्या म्हणाल्या.

























































