थियोला भावासाठी जिंकायचंय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोरोक्कोविरुद्धच्या उपांत्य लढतीत पाचव्या मिनिटाला गोल करणाऱया फ्रान्सच्या थियो हर्नांडेजला मोठा बंधू लुकास हर्नांडेजसाठी वर्ल्ड कप जिंकायचाय. लुकासदेखील फ्रान्सकडून खेळतो. गट फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत लुकासच्या गुडघ्याला दुखापत झाली. हताश झालेल्या या खेळाडूने रडतच मैदान सोडले. लुकासच्या जागेवर त्याचा लहान भाऊ थियोला संघात स्थान मिळाले. लुकासला दुखापत झाल्याने आम्ही सर्व निराश झालो होतो, मात्र आता आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आहे. लुकासने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती, मात्र जायबंदी झाल्याने त्याला मैदानाबाहेर बसून सामने बघावे लागत आहेत. देशासाठी सलग दुसऱयादा वर्ल्ड कप जिंकण्याचे लुकासचे स्वप्न होते. त्यामुळे भावासाठी फुटबॉल विश्वातील ही सर्वोच्च ट्रॉफी जिंकण्यासाठी मी मैदानावर सर्वस्व पणाला लावणार आहे, असा निर्धार 25 वर्षीय थियोने बोलून दाखवला. समोर बलाढय़ अर्जेंटिना संघ आहे याची मला कल्पना आहे. सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठल्यामुळे आमच्या फ्रान्स संघाचे मनोबल उंचावले आहे. अर्जेंटिना-फ्रान्सदरम्यानची फायनल रंगेल आणि जेतेपद मिळविण्यासाठी कुठलीच कसर सोडणार नाही, असे पुन्हा एकदा थियोने सांगितले.