लेन्स आय – गिधाडे… निसर्गाचे सफाई कामगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋता कळमणकर

गिधाडांचा आपला पहिला परिचय होतो, तो रामायणात. रावण सीतेला आकाशमार्गाने नेत असताना, त्याला अडवणाऱया आणि त्याच्यावर हल्ला करणारा जटायू हा गिधाडच.

झपाटय़ाने नामशेष होणाऱया पक्ष्यांमध्ये गिधाडे आघाडीवर आहेत. दमट, दलदलीच्या हिरव्या जंगलात पूर्वी सर्वत्र आढळणारी गिधाडे आता फार मोजकी दिसतात. यांच्या नामशेष होण्यामागे अनेक कारणे आहेत.

मृत प्राण्याच्या मृतदेहावर गुजराण करणाऱया या पक्ष्याबद्दल आपल्या मनात थोडा किळस आहे, परंतु हा अन्नसाखळीतला अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. मृतदेहावर जगून हे सफाईचे काम करतात. हे निसर्गाचे खरे सफाई कामगार आहेत.

टणक बाकदार चोच, धारदार नखे आणि तुळतुळीत डोके जे मृतदेहाच्या आत डोकावून मांस खाण्यास उपयोगी पडते. गिधाडाच्या अनेक जाती आहेत.

जंगलात आकाशात गिधाडांची गर्दी झाली की, समजावे तेथे हमखास शिकार झाली असावी. वाघ, सिंहाची शिकार खाऊन झाली रे झाली की, हे असे काही त्यावर तुटून पडतात. मृतदेहाच्या फासळय़ात अडकलेल्या मांसाचा टोकदार चोचीने फडशा पडतात.

वेगवेगळय़ा जातीची गिधाडे आकाशात एकत्र विहार करतात. यातील इजिप्टीशिअन गिधाडे जी ‘फेरोस’ बर्ड म्हणून ओळखली जातात. गिधाडे तीक्ष्ण दृष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. यांच्यातील राज गिधाड प्रथम जाड कातडी फाडून काढते आणि मग सर्व त्यावर तुटून पडतात.

निसर्गामध्ये यांची योग्य प्रमाणात संख्या असणे पर्यावरणासाठी खूप गरजेचे आहे. यांच्या संवर्धनासाठी आणि प्रजननासाठी काही संस्था कार्यरत आहेत. दिसायला फार सुंदर नसला तरी हा पक्षी वाचणे व त्याच्या संख्येत वाढ होणे, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

– [email protected]