चेंबूरच्या वसतिगृहातील पाच मुले बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील एका वसतिगृहातून बाहेर गेलेली पाच मुले बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. ती मुले वसतिगृहातून बाहेर गेली, मात्र परत न आल्याने वसतिगृहाच्या प्रशासनाकडून चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहेत.

सिद्धार्थ कॉलनी येथे आदित्य बिर्ला सेंटर फॉर वेल्फेअर ऑफ चिल्ड्रन हे वसतिगृह असून तेथे 14 ते 18 वयोगटातील अनाथ व निराधार मुले शिक्षणासाठी येतात. याशिवाय कुर्ला रेल्वे पोलीस व चाईल्ड लाईन यांना सापडलेली बेवारस मुलेदेखील येथे ठेवली जातात. दरम्यान, 17 ते 20 तारखेच्या कालावधीत पाच मुले वसतिगृहाबाहेर पडली ती परतलीच नाही. त्या मुलांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलीस ठाण्यात पाच मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वसतिगृहात मात्र खळबळ उडाली आहे. पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मानखुर्द येथील शासकीय मुलींच्या विशेष पुनर्वसन केंद्रातील वसतिगृहातून सहा मुलींनी पळ काढला होता, मात्र नंतर त्या परतल्या होत्या.