पॅराग्लायडिंग करताना सुरक्षा बेल्ट उघडल्याने साताऱ्यातील तरुणाचा कुल्लूमध्ये मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करताना सुरक्षा बेल्ट अचानक उघडला गेल्याने खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील युवकाचा मृत्यू झाला. सूरज संजय शहा (वय 30) असे मृताचे नाव आहे. कुल्लू जिह्यातील डोभी गावाजवळ शनिवारी ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याचे पार्थिव शिरवळ येथे आणण्यात येईल, असे निकटवर्तीयांनी सांगितले.

सूरज शहा याच्यासह चारजणांचा एक गट हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी आला होता आणि पॅराग्लायडिंग राईड बुक केली होती. शहा यांच्या एका मित्राने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार, त्यांची एक मैत्रीण शहा याच्या आधी पॅराग्लायडिंग राईडवर गेली आणि सुरक्षितपणे जमिनीवर आली. पुढे शहा यांना राईडवर नेण्यात आले आणि टेकऑफ केल्यानंतर लगेचच ते सुमारे तीनशे ते चारशे फूट उंचीवरून जमिनीवर पडले.

उड्डाणादरम्यान हार्नेसचा सुरक्षा बेल्ट कसा उघडला याचा तपास पोलीस करीत आहेत. अपघाताच्या कारणाबद्दल आम्हाला तज्ञांचे मत घ्यावे लागेल, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर राजीव लखनपाल यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी पायलट विमल देव यांना अटक केली आहे. त्याच्यावर कलम 336 आणि 304 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.