मुंबईत गोवरचे 6 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेले दोन दिवस गोवर रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ मात्र कायम आहे. मुंबईत आज दिवसभरात गोवरचे 6 रुग्ण तर 18 संशयित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, तीन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईत ऑक्टोबरपासून गोवंडीसह अनेक दाटीवाटीच्या भागांत मोठय़ा प्रमाणात गोवरचे रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठय़ा प्रमाणात गोवर आणि रुबेला लसीकरण हाती घेतले असून आजपासून बेघर मुलांसाठी विशेष लसीकरणही सुरू केले आहे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरापेक्षा पूर्व उपनगरामध्ये गोवरचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत आहेत. पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूरमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. मुंबईत आतापर्यंत गोवरचे 520 रुग्ण सापडले असून संशयित रुग्णांची संख्या 5 हजार 322 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने आजपासून बेघर मुलांसाठी गोवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे.